
*भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात तरुणांचा आक्रोश; राष्ट्रवादीच्या नावावर पुन्हा राखरांगोळी नको, बदल हवा!* रोहा:समीर बामुगडे भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी पक्ष जोरात काम करत असल्याचे चित्र दाखवले जात असले, तरी प्रत्यक्ष वास्तव मात्र तरुणांच्या भवितव्याची राखरांगोळी करणारे आहे. यावेळी मधु पाटील यांना पुन्हा निवडून देणे म्हणजे भुवनेश्वरमधील तरुण पिढीच्या आशांवर पुन्हा एकदा पाणी फेरण्यासारखे ठरणार आहे. विकासाच्या नावाखाली केवळ भाषणबाजी झाली, प्रत्यक्षात मात्र तरुणांच्या हातात ना कायमस्वरूपी नोकरी आली, ना सुरक्षित भविष्य.आज भुवनेश्वर गटातील वास्तव भीषण आहे. तरुणांना कॉन्ट्रॅक्टच्या तात्पुरत्या नोकऱ्यांवर ढकलले गेले आहे. कायमस्वरूपी रोजगार देण्याऐवजी तरुणांच्या आयुष्याशी प्रयोग करण्यात आले. शिक्षण घेतलेले युवक आज हमाली करण्यास मजबूर झाले आहेत. हाताला काम आहे, पण प्रतिष्ठा नाही; रोजगार आहे, पण स्थैर्य नाही. हा सगळा प्रकार कोणाच्या काळात घडला, याचा हिशेब तरुणांनी आता मोकळ्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ आली आहे.धाटाव एमआयडीसी हे रोजगाराचे केंद्र बनायला हवे होते. पण राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी या एमआयडीसीची अक्षरशः वाट लावली. उद्योग आणण्याच्या गप्पा मारल्या गेल्या, पण प्रत्यक्षात उद्योग पळवले गेले. स्थानिक तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन केवळ कागदावरच राहिले. राजकीय स्वार्थासाठी संधी विकल्या गेल्या आणि नुकसान मात्र भुवनेश्वरच्या तरुणांचे झाले.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तरुणांसाठी ठोस असे काहीही केलेले नाही. युवक धोरण, रोजगार योजना, प्रशिक्षण केंद्रे—कुठेच ठोस काम दिसत नाही. प्रत्येक निवडणुकीत तेच तेच चेहरे, तीच भाषणं आणि तेच अपयशी वचनं पुन्हा पुढे केली जात आहेत.आता तरी तरुणांनी जागे होण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी तेच तेच पुढारी नकोत. भुवनेश्वरला बदल हवा आहे, नवे नेतृत्व हवे आहे, आणि तरुणांच्या भवितव्याला दिशा देणारा योग्य उमेदवार हवा आहे. ही निवडणूक केवळ उमेदवाराची नाही, तर तरुणांच्या भविष्याची आहे—आणि हे भविष्य राखेत नाही, तर प्रगतीकडे नेण्याची वेळ आता आली आहे.या पार्श्वभूमीवर भुवनेश्वर गटातील तरुणांचा ओढा आता नव्या दिशेकडे वळताना दिसतो आहे. दीप वायडेकर या सुशिक्षित, अभ्यासू आणि प्रामाणिक तरुण नेतृत्वाला तरुणांचा ठाम पाठिंबा मिळत आहे. केवळ आरोपांची राजकारणं न करता, प्रत्यक्ष भ्रष्टाचार उघडकीस आणत दीप वायडेकर यांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. सत्तेच्या जवळ राहून मौन बाळगण्याऐवजी त्यांनी अन्यायाविरोधात उघडपणे आवाज उठवला आहे. राजकारणाला व्यवसाय न मानता समाजसेवेचे साधन मानणारा हा तरुण आज भुवनेश्वरमधील अनेक युवकांची आशा बनत आहे. बदल केवळ घोषणांमधून नाही, तर संघर्षातून घडतो, हे दीप वायडेकर यांच्या लढ्यातून स्पष्ट दिसते. त्यामुळे यावेळी भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात तरुणांचा कौल नव्या, स्वच्छ आणि धाडसी नेतृत्वाकडे जाण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
