


*आषाढी एकादशीच्या भक्तिरसात न्हाले रोहा; विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला*
(विद्यार्थ्यांच्या संतवेशाने वेधले सर्वांचे लक्ष; भाविकांसाठी उत्तम नियोजन)
महेश मोहिते..रोहा: प्रतिनिधी
रोहा शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा यंदा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पहाटेपासूनच वारकरी संप्रदायातील भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडुरंग हरी”च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्यासाठी मंदिर समिती व आयोजकांनी भाविकांच्या सोयीसाठी उत्कृष्ट नियोजन केले होते. दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्रसाद वितरणाचे नियोजन सुरळीतपणे करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकही सेवेत तत्पर होते. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते सी. डी. देशमुख कन्या शाळा आणि रावसाहेब कुलकर्णी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी अभंग गायन, टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी काढत विठ्ठल, रुक्मिणी तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांची हुबेहूब वेशभूषा परिधान केली होती. त्यांच्या मनमोहक सादरीकरणाने उपस्थित भाविकांची मने जिंकली आणि मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अधिकच खुलून गेले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रोहा शहरात भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला असून, भक्तिमय वातावरणात एकादशीचा आनंद लुटला.
