







श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सीसीटीव्ही असूनही अनधिकृत तंबूंचे अतिक्रमण!
बंधाऱ्यावर दुचाकींची घुसखोरी; नगरपरिषद आणि पोलिसांच्या गस्तीकडे नागरिकांचे लक्ष
रायगड – अमुलकुमार जैन
ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या बेशिस्त वर्तनामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि नियमांच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील बंधारा आणि पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पदपथावर अनधिकृतपणे तंबू उभारणे, तसेच वाहनांना बंदी असलेल्या भागात दुचाकी नेऊन उभ्या करणे, असे प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रत्यक्ष उपयोग काय, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप रोखण्याबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंधारा उभारण्यात आला आहे. या परिसरात नागरिकांना आणि पर्यटकांना चालण्यासाठी पदपथाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, याच जागेवर काही पर्यटकांकडून परवानगीशिवाय तंबू उभारून मुक्काम केला जात असल्याचे दिसून येत आहे. पादचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागेत दुचाकी उभ्या केल्याने नागरिकांना ये-जा करताना अडथळे निर्माण होत असून, बंधाऱ्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
पर्यटकांच्या नोंदीचा प्रश्न
हॉटेल आणि लॉजमध्ये मुक्काम करणाऱ्या पर्यटकांची ओळख पडताळणी केली जाते. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर अनधिकृतपणे तंबू उभारून राहणाऱ्या पर्यटकांची नोंद कोणत्या यंत्रणेकडे असते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा मुक्कामावर नियंत्रण नसल्यास सुरक्षेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे किनाऱ्यावर मुक्काम करणाऱ्यांसाठी स्पष्ट नियम आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांकडून मांडली जात आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे केवळ घटनांनंतरच उपयोगी?
समुद्रकिनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, या कॅमेऱ्यांमधून होणाऱ्या चित्रणावर नियमित देखरेख ठेवली जाते का, नियंत्रण कक्ष कार्यरत आहे का आणि नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होते का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. नियमबाह्य प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रतिबंधात्मक वापर झाला पाहिजे. एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच फुटेज तपासण्यापुरती ही यंत्रणा मर्यादित राहणार असेल, तर तिचा अपेक्षित उपयोग साध्य होणार कसा, असा सवाल नागरिक करत आहेत.
संयुक्त गस्त आणि दंडात्मक कारवाईची मागणी
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील बेशिस्त प्रकारांना आळा घालण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. बंधाऱ्यावर अनधिकृत तंबू उभारणाऱ्यांवर तसेच प्रतिबंधित भागात दुचाकी नेणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी. समुद्रकिनाऱ्यावर नियमित गस्त सुरू करून सीसीटीव्ही यंत्रणेच्या कार्यक्षमतेची तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पर्यटनस्थळाची स्वच्छता, सुरक्षितता आणि शिस्त राखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून पर्यटकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, नियमभंग उघडपणे होत असल्याची तक्रार समोर आल्यानंतर प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता श्रीवर्धनवासीयांचे लक्ष लागले आहे.
