


जयराम आपर्टमेट गटाराच्या संथगती कामामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान; चेतन तेलगे यांचा प्रशासनाला सज्जड इशारा!
काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देणार! माजी शहरप्रमुख चेतन तेलगे आक्रमक
रोहा:समीर बामुगडे
जयराम आपर्ट परिसरातील गटाराचे काम संथगतीने सुरू असल्याने स्थानिक दुकानदार आणि गाळेधारक त्रस्त झाले आहेत. कामातील दिरंगाईमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असून, आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दुकानांमध्ये ग्राहक येण्यास अडचणी निर्माण होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या परिस्थितीवरून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख चेतन तेलगे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
व्यापारी दुकानांचे भाडे, वीजबिल आणि इतर खर्च नियमितपणे भरत असताना संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे त्यांच्या व्यवसायाचे नुकसान होत आहे. दुकानांसमोर सुरू असलेल्या कामाचा त्रास ग्राहकांनाही सहन करावा लागत असल्याने व्यापाऱ्यांच्या रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. विकासकामे आवश्यक आहेत; मात्र ती करताना स्थानिक व्यापारी आणि गाळेधारकांना किती त्रास सहन करावा लागतो, याचाही प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे.
काम लवकर पूर्ण करण्याऐवजी दिरंगाई होत असेल, तर व्यापाऱ्यांनी व्यवसाय कसा करायचा आणि आर्थिक नुकसान कसे सहन करायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.
जयराम आपर्टमेट गटाराचे काम तातडीने पूर्ण करा आणि व्यापारी व गाळेधारकांना होणारा त्रास थांबवा. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा कडक इशारा शहरप्रमुख चेतन तेलगे यांनी दिला आहे.
व्यापाऱ्यांचे नुकसान आणि नागरिकांच्या अडचणींकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. काम तातडीने पूर्ण न झाल्यास शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशाराही त्यांनी दिला. आता प्रशासन या इशाऱ्याची दखल घेऊन कामाला गती देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
