
*आंबेपुरात काँग्रेसला जबरदस्त हादरा*शिवसेनेत जाहीर प्रवेशांची लाट, विरोधक गडबडले!अलिबाग, ता.30: रायगड जिल्हापरिषदेच्या आंबेपुर जिल्हा परिषद मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रचाराच्या ऐन धामधुमीतच काँग्रेसच्या गोटातून शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात गळती झाली असून, पोयनाड ग्रामपंचायतीचे सदस्य अजित चवरकर आणि उमेश राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे आंबेपुर मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून, विरोधकांची पकड ढासळत चालल्याचे स्पष्ट चित्र आहे.या जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र दळवी, शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी आणि शिवसेनेचे अलिबाग पंचायत समितीतील आंबेपुर गणाचे उमेदवार शैलेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष राजकीय वजन प्राप्त झाले. काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. “कार्यकर्त्यांना डावलण्याची भूमिका, विकासकामांबाबत उदासीनता आणि फक्त निवडणुकीपुरते आठवण काढण्याची सवय यामुळे आम्ही कंटाळलो होतो. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, येथे खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी मिळते,” अशी स्पष्ट भूमिका अजित चवरकर आणि उमेश राऊत यांनी मांडली. आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितले की, “आंबेपुर मतदारसंघात शिवसेनेचा जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे. विरोधकांचा दिखाऊ राजकारणावर जनता विश्वास ठेवत नाही. शिवसेना ही विकास, जनतेशी थेट संवाद आणि कार्यकर्त्यांच्या बळावर उभी असलेली संघटना आहे. त्यामुळेच आज काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत येत आहेत.”जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनीही विरोधकांवर शरसंधान साधत सांगितले की, “हा फक्त पक्षप्रवेश नसून विरोधकांच्या अपयशी नेतृत्वावर जनतेने दिलेला कौल आहे. आंबेपुरात शिवसेनेचा विजय निश्चित असून, विरोधकांना आता स्वतःचे अस्तित्व वाचवण्याची चिंता लागली आहे.”दरम्यान, आंबेपुर गणाचे शिवसेना उमेदवार शैलेंद्र पाटील यांची ताकद या प्रवेशामुळे लक्षणीयरीत्या वाढली आहे. बूथ पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, प्रचाराला नवे बळ मिळाले आहे. एकीकडे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण असताना, काँग्रेस गोटात मात्र अस्वस्थता आणि खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या गळतीमुळे काँग्रेसच्या रणनीतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंबेपुर मतदारसंघात आता शिवसेना आघाडीवर असून, विरोधकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोक्याची ठरत आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
