


*कोट्यवधींच्या स्वच्छतागृहावर अस्वच्छतेचे सावट; रोहा रेल्वे स्थानकातील दुर्दशेमुळे प्रवासी संतप्त*
*नळच गायब, दुर्गंधीचा विळखा; वाहनतळही चिखलात, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह*
*रोहा . प्रतिनिधी..( महेश मोहिते)*
मध्य रेल्वेच्या शेवटच्या स्थानकाचा मान असलेल्या रोहा रेल्वे स्थानकावर नुकतेच उभारण्यात आलेले आधुनिक स्वच्छतागृह सध्या रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या स्वच्छतागृहाची आज अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वच्छतागृहात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे, स्वच्छतागृहात पाणीपुरवठ्यासाठी नळ कनेक्शन असतानाही अनेक ठिकाणी नळ बसविण्यात आलेले नाहीत किंवा ते चोरीला गेल्याचे दिसते. त्यामुळे प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या घेऊन स्वच्छतागृहात जावे लागत आहे. वापरानंतर या रिकाम्या बाटल्या कमोडमध्ये किंवा परिसरात टाकल्या जात असल्याने स्वच्छतागृहातील ड्रेनेज व्यवस्था वारंवार तुंबत असून अस्वच्छतेची समस्या अधिक गंभीर बनली आहे. रोहा हे मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असून येथून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. राज्याच्या विविध भागांतून तसेच मुंबईकडे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची येथे दररोज वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या स्थानकावरील स्वच्छतागृहांची ही अवस्था रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. याशिवाय स्थानकाबाहेरील वाहनतळाची परिस्थितीही अत्यंत बिकट झाली आहे. पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून वाहनचालकांना चिखलात वाहने उभी करावी लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशी वर्ग स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई, नळांची तातडीने बसवणूक, तसेच वाहनतळाची दुरुस्ती करून चिखलमुक्त व्यवस्था निर्माण करण्याची अपेक्षा रेल्वे प्रशासनाकडे करत आहे. अन्यथा संतप्त प्रवासी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
