
बीएचएमएस डॉक्टरांना रोजगार व आर्थिक बळ द्या; डॉ. रश्मी जीवन जाधव यांची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ. रश्मी जीवन जाधव (BHMS) यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून त्यांना निवेदन देऊन बीएचएमएस डॉक्टरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बीएचएमएस डॉक्टर हे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून ग्रामीण व शहरी भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, मर्यादित रोजगाराच्या संधी आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक डॉक्टरांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात अडथळे येत आहेत.
यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), ग्रामीण रुग्णालये, शहरी आरोग्य केंद्रे, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) तसेच इतर शासकीय आरोग्य सेवांमध्ये बीएचएमएस डॉक्टरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, बीएचएमएस डॉक्टरांना स्वतःचे क्लिनिक किंवा आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यासाठी कमी व्याजदराचे कर्ज, शासकीय अनुदान व इतर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या प्रसंगी डॉ.निला गुप्ता, सिनियर इंजिनिअर नितीन रणखांबे आदी मान्यवर उपस्थित होते या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या डॉ.रश्मी जीवन जाधव यांनी व्यक्त केली आहे.
