


रोह्यात अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवर प्रशासनाचा बडगा
नगरपरिषद व पोलिसांची संयुक्त कारवाई; रस्ते व पदपथ मोकळे करण्यासाठी धडक मोहीम
रोहा : प्रतिनिधी.. महेश मोहिते.
शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे तसेच रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले व हातगाडी चालकांविरोधात रोहा नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी संयुक्त धडक कारवाई केली. अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे शहरातील अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. रोहा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुमार एडके आणि रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागांत ही कारवाई केली. मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर तसेच वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या हातगाड्या व फेरीवाल्यांवर प्रशासनाने कारवाई करत वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला.
शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर हातगाड्या व फेरीवाल्यांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने नागरिकांकडूनही याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने समन्वय साधत कारवाईचा बडगा उगारला.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी अनधिकृतरीत्या रस्ता व्यापणाऱ्यांना जागा मोकळी करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि वाहतुकीचे मार्ग हे नागरिकांच्या सोयीसाठी असून त्यावर अनधिकृत अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.
रोहा शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. केवळ एकदिवसीय कारवाई न राहता अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या आणि रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात नियमित मोहीम राबविल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. नगर परिषद मुख्याधिकारी अजय कुमार एडके, पोलीस निरीक्षक अभय शेलार तसेच या मोहिमेत सहभागी नगर परिषद व पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे प्रशासनाने शहरातील शिस्त आणि नागरिकांच्या सुविधांबाबत गंभीर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले.
