
रोह्यातील दमखाडी येथील नाल्यावरील स्लॅब कोसळून महिना झाला . दुरुस्तीचे काम अजूनही कागदावरच.गणेश उत्सवांच्या तोंडावर वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर व दुकानदारांचे ही नुकसान
रोहा प्रतिनिधी … महेश मोहिते .
रोहा शहरातील दमखाडी नाक्याजवळ जयराम अपार्टमेंट येथील ३० जुलै रोजी रात्री नाल्यावरील स्लॅब अचानक कोसळून तब्बल आठ वाहने नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. मात्र, दुर्घटनेला बराच कालावधी उलटूनही नाल्याच्या दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
घटना घडल्यानंतर रोहा नगराध्यक्षा वनश्री शेंडगे आणि मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. नगरसेवक रवी चाळके, महेंद्र गुजर, अजित मोरे, रोशन चाफेकर, अहमद दर्जी, संजना शिंदे, अरबाज मनीयार यांच्यासह नागरिकही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, घटना घडल्यानंतर पाहणी आणि आश्वासनांच्या पुढे प्रत्यक्ष काम किती पुढे सरकले? हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे
वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दमखाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळे, दुकाने तसेच नागरिकांची वस्ती असल्याने नाल्याच्या दुरवस्थेचा थेट परिणाम स्थानिकांच्या दैनंदिन व्यवहारावर होत आहे. दुर्घटनेमुळे अनेक दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असताना परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील पवार यांनी सांगितले की, नाल्याच्या कामासंदर्भात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर बैठक झाली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन ते तीन दिवसांत काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र, ‘दोन-तीन दिवसांत काम सुरू होईल’ या आश्वासनानंतर प्रत्यक्षात कामाची सुरुवात नेमकी कधी होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारण गणेशोत्सवाच्या काळात या परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यातच वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
सदर नाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारित येत असल्याने त्याची दुरुस्ती, सुरक्षितता आणि आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासने न देता तातडीने प्रत्यक्ष काम सुरू करून ते दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी आणि स्थानिक दुकानदारांचे आणखी नुकसान होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर काम हाती घेण्याची गरज आहे . ३० जुलैच्या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र आता प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचा संयम सुटण्याची वेळ आली आहे. ‘काम सुरू होणार’ या आश्वासनापेक्षा ‘काम सुरू झाले’ हे पाहण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
