


रोह्यात छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
मेहंदळे हायस्कूलसमोरील उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात भर; पुढील पिढीसाठी ठरणार प्रेरणादायी
खा. सुनिल तटकरे , खा. धैर्यशील पाटील यांची उपस्थिती
रोहा प्रतिनिधी ….. महेश मोहिते.
रोहा अष्टमी नगरपालिकेच्या हद्दीतील मेहंदळे हायस्कूलसमोरील जागेत रायगड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्या खासदार निधीतून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत साकारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा वनश्री शेंडगे, भाजपा तालुकाध्यक्ष अमित घाग ,नगरसेवक राजू जैन, माजी नगराध्यक्ष समीर शेंडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, रोशन चाफेकर, मयूर दिवेकर, महमद दर्जी, महेश कोल्हटकर, महेंद्र गुजर, गौरी बारटक्के, रविंद्र चाळखे , स्वप्नाली धनावडे यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
उद्यानामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास आणि त्यांचे बलिदान पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, तटकरे कुटुंबीयांचे रोह्यावर विशेष प्रेम असून शहरात विकासकामांची चुणूक पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी, त्यांचा दैदिप्यमान इतिहास व बलिदान पुढील पिढीला समजावे, या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात आले आहे. संभाजी महाराज हे संस्कृतचे अभ्यासक, साहित्यिक आणि पराक्रमी राजा होते, त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारे हे उद्यान साकारत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
तर खासदार सुनील तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करताना सांगितले की, आपण सर्व शिवभक्त आहोत. मोगल सत्तेविरोधात मराठ्यांनी दिलेला लढा आणि त्यातून निर्माण झालेला स्वराज्याचा इतिहास हा महाराष्ट्रासाठी सदैव अभिमानाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले उभारले आणि जिंकले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मरक्षण व स्वराज्यरक्षणासाठी अतुलनीय शौर्य दाखवले. छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेचे लोकार्पण होत असल्याचा आनंद असून, कोलाड येथेही छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार तटकरे यांनी दिली. रायगडच्या पायथ्याशी जन्मलो, याचा प्रत्येकाला अभिमान असून रोह्याचे शिवकालीन वैभव जपत शहराच्या पायाभूत सुविधांना गती देण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रस्तावना करताना नगराध्यक्षा वनश्री शेंडगे यांनी सांगितले की, वेळी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. सी. डी. देशमुख आणि परमपूज्य श्री. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्मारकांसह राजमाता जिजाऊ स्मारक उभारण्याच्या उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला. तसेच टाटा समूहाच्या माध्यमातून सुमारे १२० कोटी रुपयांच्या निधीतून शहरात विविध विकासकामे होणार असल्याची माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी, या उद्देशाने साकारलेले हे उद्यान रोह्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारे ठरणार आहे.
