

रोहेकरांचे श्रद्धास्थान श्री धावीर
मंदिर सभामंडप, प्रदक्षिणा मार्गासाठी २३० लाख मंजूर
रोहा प्रतिनिधी….. महेश मोहिते.
रोहेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री धावीर महाराज मंदिराच्या सभामंडप व पालखी प्रदक्षिणा मार्गाच्या विकासकामांसाठी तब्बल २३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामाचा शुभारंभ घटस्थापनेच्या दिवशी ११ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
श्री धावीर महाराजांची दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी निघणारी पालखी रोहेकरांसाठी श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. या सोहळ्यात महाराजांना शासनाच्या वतीने सशस्त्र पोलीस मानवंदना दिली जाते. पूर्वापार पोलीस मानवंदना मिळणाऱ्या देशातील दोन मंदिरांपैकी श्री धावीर महाराजांचे मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे श्रद्धास्थान असल्याने, या ऐतिहासिक परंपरेला साजेसा भव्य व सुसज्ज सभामंडप असावा, अशी भक्तांची मागणी होती.
भक्तांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून या कामाला निधी मंजूर झाला आहे. रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव किशन जावळे यांच्या स्वाक्षरीने प्रशासकीय मान्यता आदेश जारी करण्यात आला असून, हे पत्र आमदार अनिकेत तटकरे यांनी नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्याकडे सुपूर्द केले.
विशेष म्हणजे, प्रस्तावित सभामंडपाची वास्तुरचना रोह्याचेच वास्तुविशारद मोहित मोहिते यांनी केली आहे. त्यामुळे या श्रद्धास्थानाच्या विकासात स्थानिक वास्तुविशारदाचा सहभाग ही रोहेकरांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
श्री धावीर महाराजांचा नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वीच ही आनंदाची बातमी मिळाल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सभामंडप आणि प्रदक्षिणा मार्गामुळे नवरात्र उत्सवातील सोहळे, धार्मिक कार्यक्रम व विविध उत्सवांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या विकासकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्याबद्दल खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांचे रोहेकर नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत. श्रद्धा, परंपरा आणि चआधुनिक सुविधांची सांगड घालणाऱ्या या कामामुळे श्री धावीर मंदिराच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे.आधुनिक सुविधांची सांगड घालणाऱ्या या कामामुळे श्री धावीर मंदिराच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे.
