
पत्रकार जयप्रकाश पवार यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार २०२६’ जाहीर
२७ वर्षाच्या पत्रकारितेची आणि सामाजिक कार्याची दखल
अलिबाग : पत्रकारिता, सामाजिक कार्य, शैक्षणिक मदत, आरोग्यसेवा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत असलेले जयप्रकाश गजानन पवार यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. त्यांच्या दीर्घकालीन पत्रकारितेची आणि सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून, पुरस्कार जाहीर झाल्यामुळे अलिबागसह रायगड जिल्ह्यातील पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून जयप्रकाश पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जयप्रकाश गजानन पवार हे गेल्या २७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा आणि राजकीय विषयांवर लेखन केले आहे. समाजातील विविध घटकांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक परिवर्तनाशी संबंधित विषयांना त्यांनी आपल्या लेखणीद्वारे वाचा फोडली आहे.
सध्या ते प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे कोकण प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे कोकण प्रदेश सचिव आणि ‘साप्ता-मास लिडर’चे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेबरोबरच जयप्रकाश पवार यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी आतापर्यंत १८ वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान दिले असून, बेरोजगार तरुणांना शासकीय कर्ज योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांतही त्यांचा सहभाग राहिला आहे. शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे कामही त्यांनी केले आहे. समाजातील वंचित, गरजू आणि दुर्लक्षित घटकांना मदत करण्याच्या भूमिकेतून त्यांनी आपले सामाजिक कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल जयप्रकाश पवार यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार २०२६’ जाहीर झाल्याने त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार आहे. भारतीय दलित साहित्य अकादमीच्या निमंत्रणपत्रानुसार, १२ व १३ डिसेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे ४२ वे राष्ट्रीय दलित साहित्यिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात देशातील विविध राज्यांतील दलित साहित्यिक, पत्रकार, लेखक, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जयप्रकाश पवार यांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार २०२६’साठी निवड झाल्याचे त्यांच्या पुरस्कारपत्रावर नमूद आहे. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्न मांडण्याचे, जनजागृती घडविण्याचे आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देण्याचे प्रभावी साधन आहे. या भूमिकेतून पत्रकारिता आणि सामाजिक कार्य यांची सांगड घालत जयप्रकाश पवार यांनी विविध क्षेत्रांत योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त केले जात आहे. हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्याला नवी प्रेरणा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ह्या सगळ्या भूमिका पार पाडत असताना त्यांनी आपल्या कुटूंबाकडे दुर्लक्ष केले नाही,मुलींचे व्यवस्थित संगोपन करून त्यांना उत्तम शिक्षण करून स्वतःच्या पायावर उभे केले. कुटूंबातून सूध्दा त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला त्यामुळेच त्यांना या यशापर्यंत पोहचता आले.
