



ग्रुप डान्स मध्ये प्रथम क्रमांक पटकावला एंजल डान्स ग्रुप
सोलो डान्स मध्ये मुग्धा ठरली प्रथम क्रमांकची मानकरी.
रोह्यात अखिल भारतीय डान्स चॅम्पियनशिपचा जल्लोष!
प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या आयोजनाला देशभरातील १७ राज्यातील कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग..
रोहा प्रतिनिधी…. महेश मोहिते.
रोहा शहरात डॉ.सी.डी. देशमुख सभागृहात प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय डान्स चॅम्पियनशिपने रोहेकरांचे लक्ष वेधून घेतले. देशाच्या विविध भागांतून आलेल्या नृत्यकलाकारांनी आपल्या दमदार नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. आकर्षक नृत्यशैली, भन्नाट स्टेप्स आणि तालबद्ध सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण अक्षरशः नृत्यमय झाले होते.
या कार्यक्रमाला विधान परिषद आमदार अनिकेत भाई तटकरे, रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद शेठ दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके तसेच नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
स्पर्धेतील ग्रुप डान्स विभागात प्रथम क्रमांकासाठी ५५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३३ हजार ३३३ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २२ हजार २२२ रुपये अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती. तर सोलो डान्स विभागात प्रथम क्रमांकासाठी २२ हजार २२२ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार ५५५ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १२ हजार २२२ रुपये अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. ग्रुप डान्स प्रथम क्रमांक पटकावला एंजल डान्स ग्रुप.द्वितीय झिरो डिग्री डान्स ग्रुप.तॄतिय ट्रिमर्स डान्स ग्रुप. सोलो प्रथम क्रमांक मुग्धा द्वितीय रोहित पांडे तृतीय काव्या जठार त्यामुळे स्पर्धकांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली.
प्रमोद म्हसकर यांनी यावेळी सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. नवोदित आणि गुणवान कलाकारांना आपल्या कलेचे योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले रोह्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी देशभरातील कलाकारांना एकत्र आणून अशा मोठ्या स्तरावरील नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने रोह्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी ओळख मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
