


आदर्श व एकता नगरला पुन्हा एकदा दुय्यम स्थान ; वरसेच्या ‘मोठ्या’ नेत्यांची निष्क्रीयता उघडी!
रोहा:समीर बामुगडे
आम्ही वरसेचे ग्रामपंचयती चे मोठे नेते असा फुगा फुगवून मिरवणाऱ्या नेत्यांनी आदर्श नगर व एकता नगर ला दुय्यम स्थान देऊन पुन्हा एकदा फसवून केली की काय?असा जळजळीत सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. आदर्श नगर आणि एकता नगर या भागात समस्यांचा डोंगर उभा राहिला असून, इथल्या जनतेला केवळ ‘व्होट बँक’ म्हणून वापरलं जात असल्याचा कडक संताप व्यक्त होत आहे.
निवडणुका आल्या की गल्लीबोळात हात जोडून फिरणारे नेते आता कुठे गायब झाले? असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत. या भागात ना पिण्याच्या पाण्याची सोय नीट आहे, ना रस्त्यांची! वरसे भुवनेश्वर निवी कालवा रोडची तर पुरती वाट लागली आहे. हा रस्ता व्हावा म्हणून नागरिक कित्येक दिवसांपासून ओरडत आहेत, पण नेत्यांच्या कानावर जणू आवाज येत नाही.
रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हेच कळायला वाव नाही! पावसाळ्यात रस्त्याची पार चाळण होते आणि उन्हाळ्यात धूळ खावी लागते. लहान मुलं, महिला आणि वृद्धांना या खड्ड्यांमधून कसरत करत चालावं लागतं. मूलभूत गरजांसाठीही इथल्या लोकांना ताटकळत राहावं लागतंय. थोडक्यात सांगायचं तर, या भागातील वस्ती कडे फक्त मतदार म्हणून बघितले जाते. आणि म्हणूनच बहुतेक गरज सरो आणि वैद्य मारो अशी ह्या नगराची अवस्था आहे.
नेत्यांना फक्त स्वतःची प्रतिष्ठा जपायची आहे, पण जनतेच्या पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न सोडवायला यांच्याकडे वेळ नाही. जर ‘वरसे भुवनेश्वर निवी कालवा रोड’चं सिमेंट काँक्रिटीकरण आणि पाण्याच्या समस्येचा निचरा लवकर झाला नाही, तर येणाऱ्या निवडणुकीत याच नेत्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा थेट आणि कडक इशारा आदर्श नगरच्या व एकता नगर नागरिकांनी दिला आहे!
