




रोहा तालुक्यातील पिंगळसई जाणता राजा मित्रमंडळ दत्त आळी येथे साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
रोहा तालुक्यातील पिंगळसई जाणता राजा मित्रमंडळ दत्त आळी साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचे आगमन करण्यात आले. विधिवत पूजा-अर्चा करून गणेश भक्तांनी बाप्पांच्या चरणी श्रद्धा अर्पण केली. दुसऱ्या दिवशी सकाळ पासूनच विविध धार्मिक कार्यक्रम, आयोजन करण्यात आले होते.
संध्याकाळी ६ च्या सुमारास गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण फटाक्यांची आतषबाजी करत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी महिला, युवक तसेच लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
येथील साखर चतुर्थी गणेश मित्र मंडळाच्या वतीने विराजमान करण्यात आलेल्या ‘पिंगळसईचा सम्राट चे दर्शन घेण्यासाठी माननीय आमदार श्री अनिकेत तटकरे. उद्योजक श्री. प्रमोद शेठ म्हसकर . पंचायत समिती सदस्य श्री सुरेश मगर . रोहा पोलीस निरीक्षक श्री अभय शेलार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंडळास भेट दिली. यावेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
साखरचौथ गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावामध्ये भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचे वातावरण पाहायला मिळाले. गणरायाच्या विसर्जनावेळी भक्तांच्या डोळ्यांत बाप्पांना निरोप देतानाची हुरहूर दिसून आली.जाणता राजा मित्रमंडळ दत्त आळी मधील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
