
*रोहा नगर परिषद हद्दीत बेकायदेशीर व्यवसायांचा सुळसुळाट; घरगुती गॅसवर धंदे, प्रशासनाची डोळेझाक?*रोहा:समीर बामुगडे रोहा नगर परिषद हद्दीत सध्या बेकायदेशीर व अनधिकृत व्यवसायांचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून शहराच्या सुरक्षिततेचा आणि कायद्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोहा प्राईड हॉटेल कॉर्नर, मच्छी मार्केट कॉर्नर, एस.टी. स्टँड समोरील खारापटी बडापाव, दमखाडी नाका, पी.डब्ल्यू.डी. ऑफिस बाहेर, गुलाब टॉवर समोर चायनीज गाड्या तसेच शहरातील इतर अनेक ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायांमध्ये सर्रासपणे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जात असून अनेकांकडे अन्न व औषध प्रशासनाचे फूड लायसन्सही नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे.हे व्यवसाय केवळ नियमबाह्य नाहीत तर नागरिकांच्या जीविताला थेट धोका निर्माण करणारे आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर हा कायद्याने गुन्हा असून एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेत, एस.टी. स्टँडसारख्या संवेदनशील परिसरात अशा प्रकारे गॅस सिलेंडरवर चालणाऱ्या गाड्या अपघाताला आमंत्रण देत आहेत.या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत थेट रोहा नगर परिषदेकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जामध्ये संबंधित सर्व व्यवसायांकडे वैध फूड लायसन्स आहे का, किती व्यवसाय बेकायदेशीर आहेत, किती ठिकाणी घरगुती गॅसचा वापर होतो, याची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे आता नगर परिषद आणि संबंधित विभागांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.प्रश्न असा आहे की, हे सर्व प्रकार प्रशासनाच्या माहितीशिवाय सुरू आहेत का? की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे? जर नियम सर्वसामान्य नागरिकांसाठी असतील, तर मग बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? नगर परिषद, अन्न व औषध प्रशासन, अग्निशमन विभाग यांची संयुक्त जबाबदारी असताना आजपर्यंत ठोस कारवाई का झाली नाही, हे अनुत्तरित आहे.रोहा शहरातील नागरिक आता गप्प बसणार नाहीत. कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे आणि शहराला बेकायदेशीर धंद्यांच्या विळख्यातून मुक्त केलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका जनतेतून व्यक्त होत आहे. माहिती अधिकारातून येणारी उत्तरे प्रशासनासाठी आरसा ठरणार आहेत, हे मात्र नक्की.
