

*पोमेंडी पश्चिम रांगळेवाडीचा कौटुंबिक स्नेहमेळावा मोठ्या दिमाखात संपन्न*————————————–मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) साहित्य संघ, गिरगांव मुंबई येथे पोमेंडी पश्चिम रांगळेवाडी यांच्या वतीने स्व. गणपत मानक रांगळे यांच्या स्मरणार्थ आयोजित कौटुंबिक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि दिमाखात पार पडला. सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन आणि *मुंबईतील सार्वजनिक खोल्या वाचविण्याच्या संघर्षाला बळ देणारा हा स्नेहमेळावा ठरला*. वाडीतील बांधव-भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व अध्यक्ष पंढरीनाथ रांगळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला आणि एकजुटीचे प्रभावी दर्शन घडले.यावेळी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे सरचिटणीस कृष्णाजी वने गुहागर विधानसभेचे माजी आमदार विनयजी नातू भाजपा उत्तर रत्नागिरी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष तथा पोमेंडी गावचे सुपुत्र मंगेश रांगळे भाजपा उत्तर रत्नागिरीचे सरचिटणीस निलेशजी सुर्वे माजी रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांतजी शिरगावकर कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर शाखेचे अध्यक्ष अनंत मालप मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड. सुभाषजी बाणे तसेच भाजपाचे तालुकास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोमेंडी पश्चिम रांगळेवाडीने हा स्नेहमेळावा केवळ स्नेहबंध दृढ करण्यापुरता मर्यादित नसून, वाडीच्या विविध सामाजिक उपक्रमांना चालना देणे तसेच सार्वजनिक खोलीच्या लढ्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.कार्यक्रमादरम्यान कानसे ग्रुप चिखली यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कोंकणातील प्रसिद्ध नमन कलेने उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे “दक्खनचा वाघ” या ऐतिहासिक वगनाट्याने कार्यक्रमात रंगत भरली आणि उपस्थितांची मने जिंकली. यावेळी वाडी मंडळाने तयार केलेली चित्रफीत सादर करण्यात आली. या चित्रफितीतून गावच्या विकासकामांचा आढावा प्रभावीपणे मांडण्यात आला या सादरीकरणामुळे उपस्थितांना गावच्या लाल मातीची जिव्हाळ्याची आठवण झाली.मान्यवरांनी आपल्या भाषणातून पूर्वीच्या काळी गावखोलीचे सामाजिक महत्त्व, तसेच आज अनेक ठिकाणी त्या खोलींवर होणाऱ्या अन्यायकारक अतिक्रमणांवर तीव्र चिंता व्यक्त करत, पोमेंडी पश्चिम रांगळेवाडीचा सुरू असलेला लढा निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाने वाडीच्या एकजुटीने सर्व काही साध्य होऊ शकते, हा प्रेरणादायी संदेश सर्वांपर्यंत पोहोचवत सामाजिक बांधिलकी अधिक दृढ केली.
