
मुंब्र्यात दबा धरून बसलेल्या बैलचोराला रोहा पोलिसांनी केली अटक; सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून गुन्ह्याची उकल
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
रोहा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बैलचोरीच्या गुन्ह्याचा छडा लावताना रोहा पोलिसांनी धाडसी आणि कौशल्यपूर्ण तपासाची प्रचिती दिली आहे. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी थेट मुंब्रा गाठून संशयित आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे रोहा पोलिसांच्या तपासकौशल्याचे कौतुक होत आहे.
रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल, रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे आणि रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बेल्हेकर, पोलीस शिपाई चाळेकर, पोलीस शिपाई पाटील आणि चालक पोलीस हवालदार झावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 251/2026, बीएनएस कलम 303(2) अन्वये 10 ऑगस्ट 2026 रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध बैलचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यातील संशयिताची ओळख पटविण्यासाठी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेण्यात आली. त्यातून संशयित इसम हा फजल आयुब कुरेशी, रा. मुंब्रा, जि. ठाणे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तपासादरम्यान आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवून तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून त्याच्या हालचालींचा माग काढण्यात आला. आरोपी हा यापूर्वीच्या एका गुन्ह्यातही पोलिसांना पाहिजे असलेला फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार 17 सप्टेंबर रोजी पोलिसांचे पथक मुंब्रा येथे रवाना झाले. अपरिचित आणि संवेदनशील परिसरात स्थानिक मुंब्रा पोलिस ठाणे तसेच रायगड सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. आरोपी वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानात्मक होते. अखेर 18 सप्टेंबर रोजी आरोपीचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला आणि त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने साथीदारांसह सदर बैलचोरीचा गुन्हा केल्याची माहिती दिल्याने गुन्ह्याचा उलगडा झाला. आरोपीला पुढील तपासासाठी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 23 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
