
रोहा रेल्वे स्थानक होणार हायटेक, खा. तटकरे यांचे प्रयत्नांना यश, केंद्रा कडून 55 कोटी च्या निधीला मंजुरी,
रोहा प्रतिनिधी …महेश मोहिते.
कोकणी माणसाचा सर्वात आवडता गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना रोहे करांना गणपती बाप्पा पावला असल्याचे येत्या काळात रोहा रेल्वे स्थानक आता हायटेक होणार असल्याची सुखद वार्ता खा.सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत नागरिकांना दिली. रोहा रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिक सुशोभीकरण व्हावे यासाठी ते संसदेत गेल्यापासून प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत केंद्राकडून या कामासाठी 55 लाखांचा निधी मंजूर झाला आहे यामधून रोहा रेल्वे रेल्वे स्थानकाचा कसा कायापालट होत प्रवासी वर्गाला मिळणाऱ्या सुविधाची माहिती ध्वनीचित्र फिती द्वारे दाखवत पत्रकार परिषदे मध्ये दिली.भारतीय रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांनी या निधी मान्यतेला दिलेल्या मंजुरी व त्यादृष्टीने पुढे करायच्या कार्यवाही चे पत्र पत्रकार परिषदे मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांचे कडे नागरिकांचे माहिती साठी सुपूर्द केले. डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृह येथे रविवारी सायंकाळी घेतलेल्या या पत्रकार परिषद प्रसंगी
उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, जिल्हा कार्याध्यक्ष ऍड मनोजकुमार शिंदे,मुख्याधिकारी अजयकुमार एडके, जिल्हा उपाध्यक्ष समीर सकपाळ, तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोड,तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, अनंतराव देशमुख, ऍड प्रशांत देशमुख, मकरंद बारटक्के,सभापती महेंद्र दिवेकर, रविंद्र चाळके, महेश कोलटकर, गटनेते महेंद्र गुजर, रामचंद्र सकपाळ, नगरसेवक अजित मोरे, दिवेश जैन, अरबाज मनेर,कादिर रोगे, स्वप्नील धनावडे, प्रेषित बारटक्के,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात रायगड सह रोह्यातील विकासाला चालना मिळण्यासाठी खा. तटकरे सतत प्रयत्नशील आहेत. त्याच धर्तीवर रोहा रेल्वे स्थानक हे मध्य व कोकण रेल्वे यांना जोडणारे महत्वाचे स्थानक, महाराष्ट्र कंठमणी म्हणून ओळख असलेले डॉ. सी डी देशमुख, प पु. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे गाव असल्यामुळे या रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिक पद्धतीने सुशोभीकरण होत प्रवासी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी त्यांनी अधिवेशनात व प्रत्यक्ष रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे कडे पत्राद्वारे केली होती. यासोबत याचा पाठपुरावा रेल्वे बोर्डाचे चेअरमन, मुंबई विभाग व्यवस्थापक यांचे कडे सतत करत होते त्याला यश येत
रोहा रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील अभियांत्रिकी विभागाने रोहा स्थानकावरील विविध विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता देत तीन महत्त्वाची कामे शॉर्टलिस्ट केली आहेत. या कामांची एकूण अंदाजित किंमत ५४.८१ कोटी रुपये असून, संबंधित कामांना लवकरात लवकर मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्य अभियंता (नियोजन) विनोद भांगले यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, रोहा स्थानकाच्या विकासासाठी तीन कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
यामध्ये १९.२७ कोटी रुपये खर्चून सर्क्युलेटिंग एरियाचा विकास, जोडरस्त्यांची निर्मिती तसेच विद्यमान बुकिंग कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. तसेच १९.४४ कोटी रुपये खर्चून स्थानक इमारत व प्लॅटफॉर्म परिसराचे पुनर्विकासासह अग्निशमन यंत्रणेची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
तिसऱ्या कामामध्ये १६.१० कोटी रुपये खर्चून स्थानकासाठी प्रवेशद्वार उभारणे, मुख्य प्रवेशरस्त्याचे रुंदीकरण व विकास तसेच परिसराचे लॅण्डस्केपिंग करण्यात येणार आहे.
आधीच मंजूर कामालाही गती देण्याचे निर्देश
या तीन प्रस्तावित कामांबरोबरच ‘रोहा रोड – स्थानक इमारत, सर्व्हिस बिल्डिंग, फॅसाड, सर्क्युलेटिंग एरिया, कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म (COP) आदींसह रोहा स्थानकाचे उन्नतीकरण’ या कामासाठी २०२५-२६ मध्ये १९.८७ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या कामावर आतापर्यंत ७.०२ कोटी रुपये खर्च झाले असून, सध्याच्या अपेक्षित खर्चानुसार आणखी १२.८४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या कामाची निर्धारित पूर्णत्वाची तारीख ३१ मार्च २०२८ आहे.
दरम्यान, शॉर्टलिस्ट केलेल्या तीनही कामांना आवश्यक मंजुरी देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून GAD मंजुरी, निविदा प्रक्रियेचे नियोजन आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याची विनंती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली असल्याची माहिती खा सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यासोबत अष्टमी येथील उड्डाणंपुलाचे काम आता अंतिम टप्यात आले असून काही तांत्रिक अडचणी मुळे रखडलेले पडम येथील कामही लवकरच सुरु होईल. यासह पिंगलसई विभाग अंडर पास, याच विभागातील नागरिकांना रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी पादचारी पूल उभारणे यांसबधी लवकरच रेल्वे च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा करणार असल्याचे खा. सुनिल तटकरे यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे. एकूणच खा. सुनिल तटकरे यांचे विकासात्मक दृष्टीने रोहा रेल्वे स्थानक हायटेक होत अधिकाधिक नागरिकांना रेल्वे रेल्वे सेवा सुलभ होईल असे दिसत आहे.
