

निवी गावातील महिला कार्यशाळेतील अनधिकृत जिममुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाकडून कारवाईची मागणी!
रोहा:प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत अर्तगत येणा-या निवी गावातील महिला कार्यशाळेच्या इमारतीत सुरू असलेल्या जिममुळे परिसरातील नागरिक खूप त्रासले आहेत. या जिममधील मोठा आवाज, आरडाओरड आणि असभ्य भाषेच्या वापरामुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. या संदर्भात आधी तक्रार करूनही काहीच कारवाई न झाल्यामुळे आता ग्रामपंचायतीला पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले आहे.
महिलांच्या रोजगारासाठी बांधण्यात आलेल्या या कार्यशाळेचा वापर सध्या जिमसाठी केला जात आहे. येथे व्यायाम करण्यासाठी येणारे युवक रोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या आवाजात गाणी लावतात आणि आरडाओरड करतात. इतकेच नाही तर, येथे वापरली जाणारी अश्लील भाषा थेट शेजारच्या घरांमध्ये ऐकू येते. यामुळे घरातील महिला, वृद्ध आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जिमच्या या गोंगाटामुळे घरातील शांतता पूर्णपणे हरवली आहे. तसेच घरात राहणाऱ्या लहान मुलांच्या अभ्यासावर आणि मनावर याचा खूप वाईट परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी तिथल्या तरुणांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणाचेही ऐकले नाही.
या त्रासाला कंटाळून स्थानिक रहिवासी सौ. रूपिका समीर बामुगडे यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने त्यावर कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे त्यांनी आता ग्रामसेवक आणि प्रशासकांना कडक शब्दांत स्मरणपत्र दिले आहे. ही जिम पूर्णपणे अनधिकृत असून ती महिला कार्यशाळेतून लगेच बंद करण्यात यावी आणि पूर्वीच्या जुन्या जागेत घालवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच या पत्राची प्रत रायगडचे जिल्हाधिकारी, अलिबाग जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रोहा गट विकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे. आता तरी प्रशासन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करेल आणि या जिमवर कडक कारवाई करून नागरिकांना दिलासा देईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
