
कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश.
रोहा प्रतिनिधी…..महेश मोहिते.
रोह्याची सुकन्या येथील नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्व. प्रफुल्लशेठ बारटके यांची नात डॉ. प्रसाद बारटके व डॉ. सौ. पल्लवी बारटके या उभयतांची सुकन्या कु. पावनी प्रसाद बारटके हिने भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अबुधाबी येथील भारतीय दूतावासा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा(Extempore Speech Competition)मध्ये पावनी बारटके हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. १२ ते १६ वर्षे वयोगटासाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पावनी चा विषय होता ‘भारत आणि संयुक्त अरब अमिराती मधील मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध’.
पावनी ने उत्स्फूर्त वक्तृत्व, आत्मविश्वासपूर्ण मांडणी आणि प्रभावी अभिव्यक्तीच्या जोरावर हे यश संपादन केले.
पावनी हिने यापूर्वीही वक्तृत्व, निबंधलेखन, कविता लेखन व विविध साहित्यिक स्पर्धांमध्ये स्पृहणीय यश मिळवले आहे. तिच्या साहित्यिक आणि वक्तृत्व क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिला विविध व्यासपीठांवर गौरविण्यात आले आहे.
पावनीचे स्वलिखित ‘Walking with Faith’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून, या पुस्तकाला Sharjah International Book Fair येथे Best Seller Book Award ने सन्मानित करण्यात आले आहे. दोन बहिणींच्या पंढरपूर वारीच्या अनुभवावर आधारित या पुस्तकातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा सुंदर परिचय करून देण्यात आला आहे.
तसेच नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी UAE मधून बाल विभागासाठी पावनीची निवड करण्यात आली होती.
साहित्य, वक्तृत्व आणि सर्जनशील लेखन या विविध क्षेत्रांत ती सातत्याने कौतुकास्पद कामगिरी करत आहे.
नुकतेच दहावीच्या शालांत परीक्षेमध्ये ती ९८.४% गुणांनी उत्तीर्ण झाली असून आय. टी.(१००) व विज्ञान(९९) विषयांमध्ये CBSE UAE बोर्डामध्ये तिने सर्वोच्च गुण मिळवले आहेत.
कु.पावनी बारटके ही दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ चे माजी अधिष्ठाता डॉ.चंद्रमोहन भांबुरे यांची नात आहे.
पावनीच्या या यशाबद्दल तिचे पालक डॉ. प्रसाद बारटके व डॉ. पल्लवी बारटके तसेच साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
