
गटारी अमावस्येला रोहा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पाच बीटमध्ये पोलिसांची करडी नजर; फार्महाऊससह शहरातही विशेष बंदोबस्त
रोहा … प्रतिनिधी ( महेश मोहिते )
गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
गटारी अमावस्येच्या दिवशी तालुक्यात अनेक ठिकाणी मित्रपरिवाराकडून खाण्या-पिण्याच्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. तसेच अनेक फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रोहा पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन पोलीस अधिकारी आणि २४ हवालदार/पोलीस अंमलदारांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. तसेच तालुक्यातील पाच बीटमध्ये बीट अंमलदार सतर्क राहणार असून, आपल्या-आपल्या हद्दीत सातत्याने गस्त व परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत.
फार्महाऊसवर पोलिसांची नजर
रोहा तालुक्यात अनेक ठिकाणी फार्महाऊस असून गटारी अमावस्येच्या निमित्ताने काही ठिकाणी खासगी पार्ट्यांचे आयोजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फार्महाऊस, रिसॉर्ट तसेच पार्टी आयोजित होणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, ध्वनिक्षेपकाचा गैरवापर करणे किंवा इतर नागरिकांना त्रास होईल असे प्रकार घडल्यास पोलिसांकडून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातही कडेकोट बंदोबस्त
रोहा शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या मार्गांवरही पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. गटारीच्या दिवशी कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
अनधिकृत धंद्यांवरही करडी नजर
गटारीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या अनधिकृत धंद्यांनाही आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष कारवाई केली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोरपणे नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तरुणाईनेही काळजी घेण्याचे आवाहन
गटारी अमावस्येला मित्रपरिवारासोबत पार्ट्या, जेवण आणि मनोरंजनाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र आनंद साजरा करताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी तरुणांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, पोहण्याच्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, सार्वजनिक शांतता भंग होईल असे कृत्य करू नये आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी केलेल्या या नियोजनामुळे गटारी अमावस्येच्या दिवशी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज राहणार आहे. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गटारीचा उत्साह साजरा करा; मात्र सुरक्षितता आणि कायद्याचे भान ठेवूनच आनंद घ्या .
