
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; ९ हजारांची रोकड असलेली पर्स केली परत
रोहा रिक्षा संघटनेचे शाहबाज नाटुस्कर यांचे कौतुक
(रोहा – प्रतिनिधी महेश मोहिते.)
प्रवाशांच्या रिक्षात राहून गेलेल्या मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे परत करण्याची परंपरा रोह्यातील रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा जपली आहे. श्री धावीर महाराज रोहा रिक्षा चालक-मालक संस्थेचे रिक्षाचालक शाहबाज नाटुस्कर यांच्या रिक्षेत एका महिलेची पर्स राहून गेली होती. या पर्समध्ये तब्बल ९ हजार रुपये रोख होते.
६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता संबंधित महिला शाहबाज नाटुस्कर यांच्या रिक्षातून अष्टमी ते भुवनेश्वर असा प्रवास करत होती. भुवनेश्वर येथे महिलेला सोडल्यानंतर शाहबाज घरी गेले. रिक्षाची साफसफाई करत असताना त्यांना महिलेची पर्स आढळून आली.
पर्स सापडताच शाहबाज यांनी तत्काळ रोहा रिक्षा संघटनेच्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिला शोध घेत रिक्षा स्थानकात आली. यावेळी संस्थेतील रिक्षाचालकांनी शाहबाज यांना बोलावून घेतले.
महिलेची योग्य ती शहानिशा केल्यानंतर ९ हजार रुपयांच्या रोकडेसह संपूर्ण पर्स तिच्या स्वाधीन करण्यात आली. पर्स परत मिळाल्याने महिलेने शाहबाज नाटुस्कर तसेच रोह्यातील रिक्षाचालकांचे मनापासून आभार मानले.
या घटनेमुळे शाहबाज नाटुस्कर यांच्या प्रामाणिकपणाचे रोहा शहरासह संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, ‘प्रवाशांची सेवा आणि प्रामाणिकपणा’ ही रोह्यातील रिक्षाचालकांची ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे.
