

रोहा तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंना मिळणार अत्याधुनिक क्रीडा सुविधा : ना. अदिती तटकरे
एक कोटींचा निधी अपुरा ठरल्याने पाच कोटींची तरतूद; जागतिक दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचे लोकार्पण
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
तालुक्यातील खेळाडूंना दर्जेदार व अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रोहा तालुका क्रीडा संकुलाच्या आराखड्यापासून ते बांधकामापर्यंत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. स्थानिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांचा विचार करून क्रीडा संकुलाचा सर्वंकष आराखडा तयार करण्यात येणार असून, या संकुलातून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे खेळाडू घडावेत, या दृष्टिकोनातून आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिपादन ना. आदिती तटकरे यांनी केले.
धाटाव येथील रोहा तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये जागतिक स्पर्धांच्या धर्तीवर नव्याने उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टचे लोकार्पण ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, सभापती विजया पाशीलकर, रोहा-अष्टमी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपसभापती संजय मांडलूसकर, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, निधी जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, डॉ. अशोक जाधव, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, पोलीस निरीक्षक अभय शेलार, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांच्यासह क्रीडाप्रेमी, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक कोटींवरून पाच कोटींचा निधी
रोहा तालुका क्रीडा संकुल समितीची स्थापना २००३ मध्ये करण्यात आली. राज्याच्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुरुवातीला क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपयांचे अनुदान निश्चित करण्यात आले होते. मात्र, वाढता बांधकाम खर्च आणि आवश्यक क्रीडा सुविधांचा विचार करता एक कोटी रुपयांच्या निधीत दर्जेदार क्रीडा संकुल उभारणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर आदिती तटकरे यांनी क्रीडा राज्यमंत्री असताना निधी वाढविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नातून हा निधी एक कोटींवरून पाच कोटी रुपयांपर्यंत करण्यात आला. त्यामुळे रोहा तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीला नव्याने गती मिळाली.
भविष्यात अत्याधुनिक ट्रॅकसह विविध सुविधा
रोहा तालुका क्रीडा संकुलामध्ये भविष्यात अत्याधुनिक ट्रॅकसह विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना सरावासाठी मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांकडे जाण्याची गरज भासू नये, त्यांना आपल्या तालुक्यातच दर्जेदार व आधुनिक क्रीडा सुविधा मिळाव्यात, यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात रोहा तालुक्यातील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता असून, त्यांना योग्य मार्गदर्शन, सरावासाठी सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास ते निश्चितच उच्च स्तरावर चमकतील. भविष्यात या क्रीडा संकुलातून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले. जागतिक दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचे लोकार्पण झाल्याने रोहा तालुक्यातील खेळाडू व क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, क्रीडा क्षेत्राला यामुळे नवी चालना मिळणार आहे.
