


स्वकष्टाने कमावलेल्या पैशातून समाजसेवा करणे हेच माझे ध्येय : जनसेवक प्रमोद म्हसकर
रोहा प्रतिनिधी.महेश मोहिते.
शासकीय योजनांच्या माध्यमातून अनेक जण समाजोपयोगी कामे करतात; मात्र स्वकष्टाने कमावलेल्या पैशातील काही हिस्सा समाजासाठी खर्च करून गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी मोठे धैर्य आणि सामाजिक बांधिलकी लागते. ज्या समाजात माझा जन्म झाला, त्या समाजाचे आपल्यावर ऋण आहे. त्यामुळे माझ्याकडून जेवढे शक्य आहे, तेवढे समाजाला देण्याचा माझा कायम प्रयत्न राहील, असे प्रतिपादन जनसेवक प्रमोद म्हसकर यांनी केले.
प्रमोद म्हसकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करत असल्याचे प्रमोद म्हसकर यांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांतर्गत मोफत आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व कार्ड वाटप, ९० किलो बुंदी लाडू तुला सोहळा, ७६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ४३०० फळझाडांचे वाटप, १०० आदिवासी व ठाकूर समाजातील मुलांना सायकल वाटप, २५०० हून अधिक प्रतिष्ठित सभासदांना टी-शर्ट वाटप, मोफत नेत्र तपासणी शिबिर, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत शासकीय दाखले वाटप व मार्गदर्शन तसेच २०० अंगणवाड्यांना खेळणी व साहित्य वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रिशांक तेवडिका, विशाल माने, रोहा-अष्टमी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, नगरसेवक महेंद्र दिवेकर, आप्पा देशमुख, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजसेवेच्या माध्यमातून जनसामान्यांशी जोडले गेलेले प्रमोद म्हसकर हे रोहा तालुक्याचे लाडके समाजसेवक म्हणून ओळखले जात असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या तुफान गर्दीने त्यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली व्यापक लोकमान्यता अधोरेखित झाली.
