



रोहा शहर हादरले! दमखाडी नाक्याजवळ मुसळधार पावसामुळे गटारावरील स्लॅब कोसळला; अनेक वाहने गटारात, मोठी दुर्घटना टळली
रोहा: प्रतिनिधी( महेश मोहिते )
रोहा शहरातील दमखाडी नाक्याजवळ गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे गटारावरील मोठा स्लॅब अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत रस्त्यावरून जात असलेली तसेच बाजूला उभी असलेली अनेक दुचाकी वाहने थेट गटारात कोसळल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती रात्री उशिरापर्यंत समोर आली नसली, तरी मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दमखाडी नाका हा रोहा शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असून दिवसभर येथे वाहनांची आणि नागरिकांची मोठी ये-जा असते. मुसळधार पावसामुळे गटारातील पाण्याचा वेग वाढल्याने गटारावरील स्लॅबचा मोठा भाग अचानक खचला. काही क्षणांतच रस्त्याचा मोठा भाग जमिनीत कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
घटनास्थळी पाहणी केली असता गटारावरील काँक्रीटचे स्लॅब पूर्णपणे तुटून खाली कोसळलेले दिसून आले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून काही दुचाकी वाहने गटारात अडकून पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन, पोलीस आणि नगर परिषद कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसर सुरक्षित करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले असून नागरिकांना या मार्गाने जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे गटारावरील स्लॅबच्या मजबुतीबाबत तसेच देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
