
भुवनेश्वर सभागृहासाठी आलेला खासदार फंडातील निधी वळवल्याप्रकरणी ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
रोहा:प्रतिनिधी
वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सभागृहासाठी मंजूर करण्यात आलेला निधी प्रत्यक्ष सभागृहाच्या बांधकामावर न वापरता थेट साई मंदिरासाठी वळविण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते राकेश शेडगे यांनी केला आहे. या प्रकरणी ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सूचक व अनुमोदन देणाऱ्या सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे.शेडगे यांनी सांगितले की, वरसे ग्रामपंचायत हद्दीत सभागृह उभारण्यासाठी शासनाकडून विशेष निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र हा निधी सभागृहावर खर्च न करता शासकीय जागेतील साई मंदिरासाठी वापरण्यात आला. यामुळे भुवनेश्वरचे सभागृह कुठे गेले, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्यात आल्याचेही शेडगे यांनी नमूद केले. सभागृहाच्या कामाला मंजुरी देणारे अधिकारी या सर्व प्रकाराला जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी त्यांनी ठाम भूमिका मांडली.ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव करताना नियमांना डावलून चुकीच्या पद्धतीने निधीचे वाटप केल्याचा आरोप शेडगे यांनी केला. शासकीय निधीचा असा दुरुपयोग म्हणजे सामान्य जनतेशी केलेला विश्वासघात असल्याचे ते म्हणाले.शेडगे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाकडे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून ग्रामस्थांनीही न्यायाची मागणी केली आहे.
