
आरसीएफ भरती परीक्षेसाठी उमेदवारांना मार्गदर्शनाचा लाभ; 13 जून रोजी अलिबागमध्ये विशेष कार्यक्रम
अलिबाग – अमुलकुमार जैन
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) या भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत विविध पदांसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेची तयारी आणि आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘भरतीपूर्व जागरूकता कार्यक्रम’ (Pre Recruitment Awareness Programme) आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम शुक्रवार, 13 जून 2026 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 1.00 या वेळेत आरसीएफ सभागृह, क्रीडासंकुलाजवळ, आरसीएफ वसाहत, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे होणार आहे. कार्यक्रमादरम्यान ऑनलाइन परीक्षेची स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळेचे नियोजन आणि परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय विविध विषयांतील तज्ज्ञ अधिकारी उमेदवारांना मार्गदर्शन करणार असून परीक्षेसंदर्भातील शंका-समाधानाची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेपूर्वी आवश्यक माहिती आणि आत्मविश्वास मिळण्यास मदत होणार आहे.आरसीएफ प्रशासनाने या मार्गदर्शन सत्राचे वेळापत्रक संबंधित उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जामध्ये नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर पाठविले आहे. उमेदवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहताना संबंधित ई-मेलची प्रत (हार्ड कॉपी अथवा सॉफ्ट कॉपी) सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच ओळखपत्र म्हणून आधार कार्ड (प्राधान्याने), पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची छायाप्रत बरोबर आणावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेनुसार कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरसीएफ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार असून स्पर्धात्मक परीक्षेची तयारी अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.
