




जळालेल्या महिलेच्या खूनाचा उलगडा; प्रियकराला अटक
पनवेल – अमुलकुमार जैन
चिंचवली-वाकडी गावाच्या सीमेवरील वनक्षेत्रात एप्रिल महिन्यात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खून प्रकरणाचा पनवेल तालुका पोलिसांनी यशस्वी उलगडा करत मुख्य आरोपी करण नामदेव पाटील (२७, रा. शिळफाटा, ठाणे) याला अटक केली आहे.११ एप्रिल २०२६ रोजी एका महिलेचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची छाननी केल्यानंतर मृत महिला अनितादेवी भगवान राजभर (३०) असल्याचे निष्पन्न झाले.तपासादरम्यान अनितादेवीच्या संपर्कातील करण पाटील याच्यावर संशय बळावला. मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन विश्लेषणातून त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.अनितादेवी लग्नासाठी सातत्याने आग्रह धरत असल्याने आरोपीने ६ एप्रिल रोजी तिला निर्जन ठिकाणी नेऊन लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह चिंचवली परिसरात आणून पेट्रोल ओतून जाळत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.८ जून रोजी आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पनवेल तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे.
