
वाहन नसतानाही शिवभक्तांच्या सेवेसाठी आरोग्य पथक तत्परराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या कर्मचाऱ्यांचे सेवाभावी कार्य; प्रशासनाच्या दुर्लक्षाचीही चर्चा
रायगड :- अमुलकुमार जैन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड किल्ल्यावर लाखो शिवभक्त दाखल होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) पथकाने विशेष आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र या सेवाभावी कार्यामागे एक गंभीर बाब समोर आली असून, पथकाचे अधिकृत वाहन मुदत पूर्ण होऊन जवळपास अडीच महिने उलटले तरी नव्या वाहनासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पथक वाहनाविना काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.रायगड किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता तसेच इतर आरोग्य कर्मचारी शिवभक्तांना सेवा देण्यासाठी दिवसरात्र कार्यरत आहेत. किल्ल्यावर येणाऱ्या भाविकांना उष्माघात, निर्जलीकरण, रक्तदाब, मधुमेह, थकवा किंवा इतर किरकोळ आजारांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी आवश्यक औषधसाठा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकाकडे अधिकृत वाहन उपलब्ध नसतानाही अनेक कर्मचारी स्वतःच्या खर्चाने प्रवास करून रायगड किल्ल्यावर पोहोचले आहेत. वाहनाची मुदत संपल्यानंतर नव्या वाहनासाठी निविदा काढण्यात झालेल्या विलंबामुळे पथकाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही या कर्मचाऱ्यांनी कोणतीही तक्रार न करता शिवभक्तांच्या सेवेला प्राधान्य दिले आहे.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो शिवप्रेमींच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळताना हे पथक अत्यंत समर्पितपणे कार्यरत असून त्यांच्या सेवाभावाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मात्र दुसरीकडे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासारख्या महत्त्वाच्या योजनेतील पथकाकडे आवश्यक वाहन सुविधा उपलब्ध नसणे ही बाब चिंताजनक मानली जात आहे.शिवभक्तांना अखंड आणि तत्पर आरोग्य सेवा देणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्याला प्राधान्य दिल्याने त्यांच्या कार्याबद्दल नागरिकांमधून आणि शिवप्रेमींकडून विशेष प्रशंसा व्यक्त केली जात आहे. तसेच संबंधित प्रशासनाने वाहनाच्या निविदा प्रक्रियेला गती देऊन या पथकाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणीही व्यक्त होत आहे.
