



स्वस्तात सोन्याचे आमिष; रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यावर जीवघेणा हल्ला, ५२.८० लाखांची लूट
रायगड – अमुलकुमार जैन
स्वस्तात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवून रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा व्यावसायिक अविनाश अनिल नलावडे (वय ३४, रा. सणसवाडी, ता. माणगाव) यांना अहिल्यानगर जिल्ह्यात बोलावून त्यांच्यावर आणि त्यांच्या साथीदारांवर जीवघेणा हल्ला करत तब्बल ५२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नलावडे यांच्याकडे काम करणारे राजू मोहिते व अक्षय मोहिते यांनी बापू पवार याची ओळख करून देत चार किलो सोने प्रतिकिलो २५ लाख रुपयांना विकण्याचे आमिष दाखवले होते. व्यवहारासाठी गुरुवारी नलावडे हे ४६ लाख रुपये रोख रक्कम, सराफ व्यावसायिक सोनाराम माळी आणि चालक प्रकाश जंगम यांच्यासह रवाना झाले. आरोपींनी त्यांना विविध ठिकाणी फिरवून अखेर अहिल्यानगर तालुक्यातील बुरूडगाव शिवारातील निर्जन भागात बोलावले.तेथे सोन्याची तपासणी सुरू असतानाच आरोपींनी शिट्टीचा इशारा देत उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या १० ते १२ साथीदारांना बोलावले. टोळीने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी तिघांना बेदम मारहाण करून ४६ लाख रुपये रोख, सोन्याची साखळी, लॉकेट व अंगठ्या असा एकूण ५२.८० लाखांचा ऐवज लुटला.या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात १४ ते १६ जणांविरोधात दरोडा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
