रायगड – अमुलकुमार जैन
जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी लायन्स क्लब ऑफ मुरुड-जंजिराने पुढाकार घेत एक आगळावेगळा उपक्रम राबविला. समाजसेवक तथा मुरुड तालुका अध्यक्ष लायन सनी सोगावकर यांच्या विशेष प्रयत्नांतून बोर्ली जेष्ठ नागरिक सामाजिक संस्थेच्या प्रत्येक सदस्याला रक्तदाब मोजणी यंत्र (ब्लड प्रेशर मॉनिटर) भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले.
मराठी शाळेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत यंत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेतन भोईर होते, तर लायन डॉ. रेखा म्हात्रे आणि लायन सनी सोगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी MJF लायन विजय वनगे, लायन सी. एम. ठाकूर, लायन मकरंद कर्णिक, लायन रवींद्र भोवर, लायन अशोक मुरुडकर, लायन भारत मोती यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. संस्थेचे पदाधिकारी, समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिकांनी कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.
रक्तदाबासारख्या महत्त्वाच्या आरोग्य निर्देशांकावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी हे यंत्र जेष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. डॉ. रेखा म्हात्रे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन करत रक्तदाब नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच मशीनचा योग्य वापर कसा करावा याचे सविस्तर प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
जेष्ठ नागरिकांना स्वावलंबी आरोग्यसेवेची सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून उपस्थितांनी लायन्स क्लबच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
