




कोकण बँकेला ‘बेस्ट मल्टी-स्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक’ पुरस्कार
रायगड |अमुलकुमार जैन
कोकण मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लि. ला मुंबई येथे आयोजित प्रतिष्ठित ‘इंडियन बँकिंग समिट अँड अवॉर्ड्स २०२६’ मध्ये ‘बेस्ट मल्टी-स्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बँकेच्या उत्कृष्ट आर्थिक कामगिरी, ग्राहकाभिमुख सेवा आणि सहकारी बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष असिफ दादान यांनी सहकाऱ्यांसह हा पुरस्कार स्वीकारला.१९६९ मध्ये ‘रत्नागिरी मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ म्हणून सुरू झालेली संस्था आज मल्टी-स्टेट सहकारी बँक म्हणून कार्यरत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि गोवा येथे २५ हून अधिक शाखांद्वारे बँक सेवा देत असून तिचा एकूण व्यवसाय एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.ग्राहकांना बचत, मुदत ठेवी, गृह, वाहन, शैक्षणिक व व्यावसायिक कर्जांसह मोबाईल बँकिंग, यूपीआय, आयएमपीएस आणि व्हॉट्सॲप बँकिंगसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यापूर्वी २०२४ मध्येही बँकेला ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’ पुरस्कार मिळाला होता.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोंडकरी यांना ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने गौरविण्यात आले. दरम्यान, या यशाबद्दल नौशाद दळवी, मतीन शेख, अझीम दांडेकर, सईद शेख, मुनीर हातोडकर, इरफान झोंबढकर आदींनी बँकेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
