


काशीद बीचवर जूनच्या पहिल्या विकेंडला पर्यटकांची तोबा गर्दीप्रचंड उकाड्यामुळे समुद्रस्नानाचा मनसोक्त आनंद; किनाऱ्यावर वाहनांच्या रांगा
काशिद बीच – अमुलकुमार जैन
मुरुड तालुक्यातील जागतिक पर्यटन नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या काशीद समुद्रकिनाऱ्यावर जून महिन्याच्या पहिल्या विकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी उसळली. रविवारी सकाळपासूनच समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची लगबग पाहायला मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या पर्यटकांनी समुद्रात पोहण्याचा आणि विविध जलक्रीडांचा मनसोक्त आनंद लुटला.शुभ्र वाळूचा किनारा, फेसाळणाऱ्या लाटा आणि निळाशार समुद्र यामुळे काशीद बीच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरला आहे. भरतीच्या वेळी उसळणाऱ्या लाटांमध्ये पर्यटक मोठ्या उत्साहाने समुद्रस्नान करताना दिसून आले. कुटुंबीय, मित्रमंडळी तसेच तरुणांचा मोठा प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला.पर्यटकांच्या मनोरंजनासाठी येथे स्पीडबोट, पॅरासेलिंग, बनाना राईड, बंपर राईड तसेच घोडा आणि उंट सफरीची सुविधा उपलब्ध आहे. या सर्व उपक्रमांचा पर्यटकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. किनाऱ्यालगत खाद्यपदार्थ, चहा-नाश्ता आणि शीतपेयांच्या स्टॉलवरही मोठी गर्दी दिसून आली.शनिवार-रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी काशीद बीचवर पर्यटकांची संख्या नेहमीच वाढलेली असते. यामुळे समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. काही वेळा वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. देशाच्या विविध भागांबरोबरच परदेशी पर्यटकही काशीदला आवर्जून भेट देत असल्याने या पर्यटनस्थळाचे महत्त्व अधिक वाढले आहे.यंदा पावसाळ्याची अद्याप दमदार सुरुवात झाली नसल्याने आणि उष्णतेचा कडाका कायम असल्याने जूनच्या पहिल्याच विकेंडला काशीद बीच पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेला. समुद्राच्या लाटांमध्ये रममाण होत पर्यटकांनी उकाड्यापासून दिलासा मिळवत सुट्टीचा आनंद द्विगुणित केला.
