राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (प्रोटान विंग) यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार (दि. ५) रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यव्यापी अभियानाचा एक भाग म्हणून हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि अंगणवाडी सेविकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या, नीट आणि इतर ऑनलाइन परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तसेच अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांबाबत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.जुन्या निवृत्तीवेतन योजनेची पुनर्अंमलबजावणी, समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेणे, रिक्त शिक्षक व शिक्षकेतर पदांची तातडीने भरती करणे, खाजगी अनुदानित शाळा व महाविद्यालयांना संपूर्ण अनुदान देणे, सीएचबी व तात्पुरत्या शिक्षकांना सेवासुरक्षा आणि नियमित सेवेचे लाभ प्रदान करणे, तसेच सेट, नेट आणि पीएचडीधारक शिक्षकांना पदोन्नती व योग्य वेतनश्रेणी लागू करणे या प्रमुख मागण्या आंदोलनाद्वारे मांडण्यात येणार आहेत.शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रोटान संघटनेने केली असून आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
