

अवघे सातवीपर्यंतचे शिक्षण, पदरी दोन चिमुकली मुले आणि वैधव्य; तरीही गाठले रेल्वेतील अधिकारीपद”
रायगड – अमुलकुमार जैन
काही व्यक्तींचा जीवनप्रवास हा केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नसतो, तर तो समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतो. भुसावळ येथील लीला दिनकर वानखेडे यांची कहाणी अशीच आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पतीचे निधन, पदरी दीड आणि तीन वर्षांची दोन चिमुकली मुले, शिक्षण केवळ सातवीपर्यंत आणि समोर अंधकारमय भविष्य. अशा कठीण प्रसंगात अनेकजण खचून गेले असते; मात्र लीलाताईंनी संकटांशी दोन हात करत संघर्षाचे रूपांतर यशात केले.१९७९ मध्ये पतीच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. दोन लहान मुलांचे संगोपन, घराचा खर्च आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची धडपड अशा अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र परिस्थितीसमोर हात टेकण्याऐवजी त्यांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर नव्याने उभे राहण्याचा निर्धार केला.१८ ऑक्टोबर १९८० रोजी त्यांना रेल्वेमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. ही नोकरी त्यांच्या आयुष्यातील नवे पर्व ठरली. दिवसभर नोकरी, घरातील जबाबदाऱ्या आणि मुलांचे संगोपन सांभाळताना त्यांनी शिक्षणही सुरू ठेवले. बाहेरून दहावीची परीक्षा देऊन त्या यशस्वी झाल्या. शिक्षणामुळे त्यांना लिपिक पदावर पदोन्नती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.प्रामाणिकपणा, मेहनत आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर त्यांनी रेल्वे प्रशासनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सातवी शिक्षण असलेल्या एका विधवा महिलेने रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात ऑफिस सुपरिटेंडेंट पदापर्यंत मजल मारणे ही त्या काळातील अत्यंत उल्लेखनीय बाब होती. तब्बल ४५ वर्षांची निष्कलंक सेवा पूर्ण करून त्या सन्मानाने सेवानिवृत्त झाल्या.सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य सुरू ठेवले आहे. स्वतःच्या हस्ताक्षरात ज्ञानेश्वरी, गजानन विजय ग्रंथ आणि भगवद्गीता लिहिण्याचे कार्य त्यांनी केले असून सध्या भागवत ग्रंथाचा अभ्यास करीत आहेत. साहित्य मंचाच्या माध्यमातून कविता, चारोळ्या आणि विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये त्या सक्रिय सहभाग घेत आहेत.महिला मंडळे, विवाह मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्या गरजू कुटुंबांना मदत करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आपल्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी पालखी अर्पण करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरणही घालून दिले आहे.आज वयाच्या ७१ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. त्यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन दोन्ही मुले उच्च पदांवर कार्यरत आहेत. मोठा मुलगा कतारमध्ये आयटी क्षेत्रात तर धाकटा मुलगा मुंबईत रेल्वेत साहाय्यक नियंत्रक म्हणून कार्यरत आहे.“कार्य हे नेहमी सहकार्यानेच पूर्ण होते,” या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या लीलाताई वानखेडे यांचा जीवनप्रवास संकटांनी घेतलेल्या परीक्षेतून घडलेल्या यशाचा महामेरू आहे. वैधव्य, गरिबी, अपुरे शिक्षण आणि एकल मातृत्व या सर्व अडथळ्यांवर मात करून त्यांनी सिद्ध केले की जिद्द, परिश्रम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्याचा नवा इतिहास घडवू शकते.
