



मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगावच्या कोंडीतून सुटकेसाठी चालकांची नवी शक्कल!
अपूर्ण बायपास आणि अंतर्गत रस्त्यांचा वापर; प्रवाशांचा तासभर वेळ वाचतोय
रायगड – अमुलकुमार जैन
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर परिसरातील वाहतूक कोंडीने प्रवाशांचा संयम संपवला असताना वाहनचालकांनी त्यातून मार्ग काढण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. माणगाव बायपासचे काम अद्याप अपूर्ण असतानाही अनेक चालक आणि पर्यटक या अपूर्ण बायपासचा तसेच अंतर्गत ग्रामीण रस्त्यांचा वापर करून मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा तब्बल पाऊण ते एक तास वेळ वाचत असल्याचे समोर आले आहे.मुंबई-गोवा महामार्गावर विशेषतः शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे माणगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेकदा वाहनांच्या रांगा काही किलोमीटरपर्यंत पोहोचतात. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या चालकांनी आता पर्यायी मार्गांचा शोध घेतला आहे.कोकणातून मुंबई-पुण्याकडे जाणारी वाहने माणगाव शहरात न शिरता ढालगर फाट्यावरून अपूर्ण बायपासमार्गे खर्डी फाट्यापर्यंत जातात. त्यानंतर निजामपूर मार्गे पुढील प्रवास सुरू ठेवला जातो. त्याचप्रमाणे मुंबई-पुण्याकडून कोकणात येणारे प्रवासीही निजामपूर-खर्डी मार्गाचा वापर करून बायपासमार्गे ढालगर फाट्याजवळ महामार्गावर येतात. या पर्यायी मार्गामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळता येत असल्याने प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होत आहे.माणगाव बायपासचे काम पूर्ण होण्यास अद्याप विलंब होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि खासदार सुनील तटकरे यांनी मे अखेरपर्यंत बायपास पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कोकण रेल्वेच्या विद्युत खांबांशी संबंधित तांत्रिक अडचणी आणि कामाच्या संथ गतीमुळे हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही.तथापि, या अपूर्ण बायपासवरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. अनेक ठिकाणी रस्ता कच्चा असून खडी आणि माती पसरलेली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने अपरिचित चालकांची गैरसोय होत आहे. तसेच काही ठिकाणी अरुंद मार्ग आणि भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. काही बेशिस्त चालक लेन सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने या पर्यायी मार्गावरही वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.एकीकडे प्रशासनाकडून बायपास सुरू होण्याची प्रतीक्षा कायम असताना, दुसरीकडे वाहनचालकांनी शोधलेला हा पर्यायी मार्ग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र सुरक्षित आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगाव बायपासचे काम तातडीने पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
