


**रोहा बस स्थानकात प्रवाशांचे अतोनात हाल! भर उन्हाळ्यात पंखे गायब, तर सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात**
**रोहा ( महेश मोहिते ):**
सध्या संपूर्ण राज्यभरात उन्हाचा पारा चाळीशी पार गेला असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशा कडक उन्हात प्रवाशांना दिलासा देण्याऐवजी रोहा बस स्थानकातील ढिसाळ आणि भोंगळ कारभारामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. येथील प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकात लावण्यात आलेल्या पंख्यांपैकी चक्क दोन पंखे गायब झाले असून, त्या ठिकाणी नवीन पंख्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे पंखे नक्की चोरीला गेले की नादुरुस्त झाल्यामुळे काढून ठेवण्यात आले आहेत, असा संतप्त सवाल आता प्रवासी आणि नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ चा नारा देऊन संपूर्ण देशात स्वच्छतेचे आवाहन करत आहेत. मात्र, रोहा बस स्थानकात या अभियानाचा पुरता बुरखा फाटल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. या बस स्थानकात चक्क सांडपाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसून, ते पाणी स्थानक परिसरातूनच वाहताना दिसत आहे. परिणामी, संपूर्ण बस स्थानकात प्रचंड दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना तिथे पाच मिनिटे उभे राहणेही असह्य झाले आहे.रोहा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने या बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी, चाकरमाने आणि शालेय विद्यार्थी ये-जा करत असतात. मात्र, स्थानकातील या सांडपाण्यामुळे डासांचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवाशांना मलेरिया, डेंग्यू यांसारख्या साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाच्या त्रासासोबतच या दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये प्रशासनाविरोधात कमालीची नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.प्रवाशांकडून विविध(तिकीट )करांच्या माध्यमातून महसूल गोळा करणाऱ्या एसटी महामंडळाला प्रवाशांना मूलभूत सुविधा देणेही जमेनासे झाले आहे. भर उन्हाळ्यात हक्काचा वारा मिळेनासा झाला आहे आणि दुसरीकडे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आगार व्यवस्थापन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. *”उन्हाळ्यात प्रवाशांना साधे पंखे न मिळणे आणि स्थानकात घाणीचे साम्राज्य असणे ही प्रशासनाची मोठी दिरंगाई आहे. प्रशासनाने तात्काळ गायब झालेल्या जागेवर नवीन पंखे बसवावेत आणि सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावून बस स्थानकाची स्वच्छता करावी. अन्यथा, प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी दिला आहे.*
