
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ‘मेट्रो रायगड’ साप्ताहिकाचे अनावरण
अलिबाग – अमुलकुमार जैन
अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय कवठेकर यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणाऱ्या ‘मेट्रो रायगड’ या साप्ताहिकाच्या नव्या अंकाचे अनावरण रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार धनंजय कवठेकर उपस्थित होते.रायगड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विकासात्मक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘मेट्रो रायगड’ साप्ताहिकामार्फत सातत्याने केले जात असल्याबद्दल जिल्हाधिकारी जावळे यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक प्रश्नांना वाचा फोडतानाच विकासकामांबाबत जनजागृती करण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी धनंजय कवठेकर यांनी साप्ताहिकाच्या वाटचालीची माहिती देत रायगड जिल्ह्यातील विविध विषयांवर वस्तुनिष्ठ आणि निर्भीड पत्रकारिता करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच वाचकांच्या विश्वासाच्या बळावर ‘मेट्रो रायगड’ ने आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.अनावरण सोहळा साध्या पण उत्साही वातावरणात पार पडला. जिल्हाधिकारी जावळे यांनी साप्ताहिकाच्या अंकाचे अवलोकन करून त्यातील विविध बातम्या व लेखांची माहिती घेतली. या प्रसंगी *‘मेट्रो रायगड’*च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत समाजहिताच्या पत्रकारितेचा ध्यास कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
