



दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्ध महिलेची हत्या; दोघांना अटक
अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील सारळ आदिवासीवाडी येथील ८५ वर्षीय सुनंदा लक्ष्मण पाटील यांच्या बेपत्ता प्रकरणाचा मांडवा पोलिसांनी उलगडा करत दागिन्यांच्या हव्यासापोटी झालेल्या हत्येचे गूढ उकलले आहे. या प्रकरणी महिलेचा नातेवाईक अनदर्श हिराजी शेडगे (३२) आणि रितेश नरेश लोहार (२०, दोघे रा. तिनविरा, ता. अलिबाग) यांना अटक करण्यात आली आहे.सुनंदा पाटील या ३१ मे रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान आरोपींनी दागिने लुटण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून देण्यात आला.पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह फेकल्याचे ठिकाण दाखवून दिले. त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.या प्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
