


*रोहा-कोलाड रस्त्यावरील ‘गंगा’ नदी पुलाला मोठ्या भेगा; रोठ खुर्द गावाला पुराचा वेढा, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता*
*महेश मोहिते प्रतिनिधी. रोहा
*रोहा-कोलाड रस्त्यावरील रोठ खुर्द गावाजवळ असलेल्या गंगा नदीच्या पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून, पुलाला जागोजागी मोठ्या भेगा पडल्या आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या काळातील हा ऐतिहासिक पूल आता मृत्यूचा सापळा बनण्याची भीती निर्माण झाली आहे. या पुलाखालील औद्योगिक क्षेत्रातील पाईपलाईनमध्ये अडकणाऱ्या कचऱ्यामुळे रोठ खुर्द गावात पूरस्थिती निर्माण होत असून, प्रशासनाच्या या ढिसाळ व दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गंगा नदी पुढे जाऊन कुंडलिका नदीला मिळते. पावसाळ्यात या नदीतून वाहून येणारा कचरा आणि गाळ धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कंपनीच्या पाईपलाईनमध्ये अडकतो. या अडथळ्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होत नाही आणि गंगा नदीचे पाणी थेट रोठ खुर्द गावात शिरते. यामुळे दरवर्षी गावातील अनेक घरांचे व शेतीचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती गावाचे माजी सरपंच लीलाधर पांडुरंग मोरे यांनी दिली. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या दालनात एक महत्त्वाची सभा पार पडली होती. या सभेत धाटाव औद्योगिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि रोठ खुर्द गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी पाईपलाईनमुळे होणाऱ्या पुराच्या पाण्याच्या त्रासाचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला होता. या बैठकीनंतर प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी सरपंच लीलाधर पांडुरंग मोरे, दीपक कर्णेकर, हरिश्चंद्र मोरे, देवराम कर्नेकर, राकेश मोरे, रमेश मोरे, अमोल ढमाले, विठ्ठल बोरेकर आणि धाटाव औद्योगिक क्षेत्राचे अधिकारी विनीत साहेब यांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणी दरम्यान ग्रामस्थांना आणखी एक धक्कादायक बाब आढळून आली. रोहा-कोलाड या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या गंगा नदीवरील पुलाला अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. हा पूल अतिशय कमकुवत झाला असून, येथून अवजड वाहतूक सुरू राहिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. हा रस्ता केवळ स्थानिक वाहतुकीसाठी नसून मुरुड, अलिबाग, नागोठणे आणि थेट गोव्याला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे. त्यामुळे या पुलाला काही झाल्यास कोकण आणि गोव्याचा संपर्क तुटण्याची भीती आहे. “प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पुलाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास अनर्थ ओढवू शकतो,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी तत्काळ ‘संभाव्य धोक्याचे सूचना फलक’ लावावेत आणि पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटसह दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी रोठ खुर्दच्या ग्रामस्थांकडून केली जात आहे. आता यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
