


रेवदंड्यात राजकीय घडामोडींना वेग; उपसरपंचपदी संतोष (बाबू) मोरे यांची बाजी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ९ विरुद्ध ७ मतांनी विजय; ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरणांवर चर्चा
अमुलकुमार जैन
रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर निर्णायक वळण मिळाले असून रिक्त झालेल्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सदाशिव (बाबू) मोरे यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे रेवदंड्यातील स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.माजी उपसरपंच सौ. मंदा माणिक बळी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झाले होते. या प्रकरणी शेकापचे कार्यकर्ते सुशील सुर्वे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आणि रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली.निवडणुकीत संतोष (बाबू) मोरे आणि सुराराम मोहनलाल माळी यांच्यात थेट सामना रंगला. एकूण १६ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये संतोष मोरे यांना ९ तर सुराराम माळी यांना ७ मते मिळाली. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली.या निकालाची विशेष चर्चा होत आहे. ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाकडे संख्याबळ अधिक असल्याचे मानले जात असतानाही संतोष मोरे यांनी विजय संपादन केल्याने मतदानातील राजकीय गणितांबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. काही सदस्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.संतोष मोरे यांना सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील दिवंगत सदाशिव गणपत मोरे (दादा मोरे) यांनी अनेक वर्षे रेवदंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून काम पाहिले होते. तसेच त्यांच्या पत्नी सोनाली संतोष मोरे यांनी सरपंचपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.विजयाची घोषणा होताच संतोष मोरे यांनी हात उंचावत “लाल सलाम”ची घोषणा दिली. कार्यकर्त्यांनीही घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हा विजय ग्रामस्थांचा असून रेवदंड्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.या विजयासाठी सुरेश खोत, अशोक नाईक, शरद वरसोलकर, शरद पाटील, जनार्दन कोंडे, संदीप खोत, विजय चौलकर, निलेश गाडे, निलेश खोत, प्रमोद नवखारकर (बाळू), मिलिंद चुनेकर, मिलिंद वाडकर, राहुल गणपत, संतोष जाधव, आशिष गोधळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याचे सांगण्यात आले.रेवदंडा ग्रामपंचायतीतील या निकालामुळे स्थानिक राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून आगामी ग्रामपंचायत निवडणुका आणि स्थानिक राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
