
रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रोहेकरांना अनमोल भेट; राजमुद्रा फाउंडेशनची रुग्णवाहिका जनसेवेत दाखल
महेश मोहिते रोहा प्रतिनिधी:
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव नव्हे, तर समाजाप्रती असलेली बांधिलकी कृतीतून सिद्ध करण्याची संधी असते. याच भावनेतून लोकनेते, दानशूर व्यक्तिमत्त्व तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील नागरिकांना एक अमूल्य भेट देण्यात आली. मा. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या विशेष सहकार्यातून राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक रुग्णवाहिका जनसेवेसाठी मंगळवार दि. (२ ) रोजी पनवेल येथे समर्पित करण्यात आली. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि भविष्यातील आरोग्यसेवेबाबतचा विश्वास यावेळी स्पष्टपणे दिसून आला.
आजही अनेक ग्रामीण भागांमध्ये वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी ही रुग्णवाहिका केवळ एक वाहन नसून संकटसमयी धावून येणारी जीवनदायिनी ठरणार आहे. विशेषतः धाटाव विभागातील ग्रामीण भाग, धाटाव एमआयडीसी परिसर तसेच रोहा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सेवा मोठा आधार ठरणार आहे. या प्रसंगी राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित घाग, सचिव सचिन मोरे, श्रद्धा घाग, शिवाजी दिवकर, सार्थक डाके व साईश घाग उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष राजेश भगत, श्रीकांत दरडे , प्रितेश वारंगे, अमोल घाग, जितेंद्र जाधव, अमर वारंगे, सागर डाके, विलास डाके, श्रद्धा कुंडे, रवी ठाकूर , सुबोध पाटील , साहिल जोधले आणि ॲड. दिनेश वर्मा यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवत या लोकहितकारी उपक्रमाचे कौतुक केले. तर राजकारण, समाजकारण आणि लोकसेवा यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यापेक्षा एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी हातभार लावणे अधिक महत्त्वाचे असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा उपक्रम असल्याच्या भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. रोहेकरांच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहण्याची परंपरा जपणाऱ्या ठाकूर कुटुंबाच्या जनसेवेच्या वाटचालीत हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. भविष्यात हजारो गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देत ही रुग्णवाहिका अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.समाजसेवा ही केवळ शब्दांत नसून ती कृतीतून दिसली पाहिजे. एखाद्या गरजू रुग्णाला योग्य वेळी उपचार मिळणे आणि त्याचा जीव वाचणे यापेक्षा मोठे पुण्य दुसरे नाही. राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून जनतेसाठी समर्पित करण्यात आलेली ही रुग्णवाहिका रोहा तालुक्यातील नागरिकांसाठी मोठा आधार ठरेल. संकटाच्या क्षणी धावून जाणारी मदतीची गाडी म्हणजेच खरी समाजसेवा आहे. ही रुग्णवाहिका अनेक गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळवून देईल, अनेक कुटुंबांना दिलासा देईल आणि अनेकांचे प्राण वाचविण्याचे पुण्यकार्य करेल, असा मला विश्वास आहे. जनसेवेचा हा वसा भविष्यातही अखंडपणे सुरू राहावा, हीच वाढदिवसानिमित्त माझ्यासाठी सर्वात मोठी शुभेच्छा आहे,” असे गौरवोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. यावेळी मा. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष अमित घाग यांच्या समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि जनकल्याणाच्या विविध क्षेत्रांत सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी, गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच आरोग्यविषयक सेवांच्या बळकटीकरणासाठी अमित घाग व राजमुद्रा फाउंडेशन करीत असलेले कार्य उल्लेखनीय असून, समाजहिताची जाणीव ठेवून कार्य करणारे असे तरुण नेतृत्व भविष्यात अधिक व्यापक स्तरावर जनसेवा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
