

बेकायदेशीर बांधकाम’ की ‘नियमबद्ध पुनर्बांधणी’? चाँद बेपारी यांच्या इमारतीवरून मुरुडमध्ये वादंग
मुरुड जंजिरा- अमुलकुमार जैन
मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील दरबार रोड परिसरातील सर्व्हे क्रमांक ९७/३/ब येथील इमारतीच्या बांधकामावरून सध्या मुरुडमध्ये वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत रमाकांत सुर्वे यांनी संबंधित बांधकामाविरोधात नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, नगरपरिषद प्रशासनाने हे बांधकाम पूर्णपणे अधिकृत असल्याचा दावा करत सर्व नियमांचे पालन करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.सुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित इमारत चाँद गुरुसाब बेपारी यांच्या मालकीची असून ती अनेक वर्षे जीर्ण अवस्थेत होती. पावसाच्या पाण्यामुळे इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. इमारतीतील लोखंडी सळ्या गंजलेल्या अवस्थेत असल्याचा दावा करत त्यांनी त्यासंदर्भातील छायाचित्रेही तक्रारीसोबत जोडली आहेत. अशा परिस्थितीत शासनमान्य संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट न करता पुनर्बांधणीला परवानगी देण्यात आली असल्यास ते गंभीर स्वरूपाचे प्रकरण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.याशिवाय, संबंधित बांधकामासाठी आवश्यक असलेली सीआरझेड मंजुरी, झोन प्रमाणपत्र तसेच विविध विभागांची ना-हरकत प्रमाणपत्रे प्राप्त करण्यात आली आहेत का, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. नगरपरिषदेकडून पूर्वी देण्यात आलेली परवानगी कालबाह्य झाली असल्याने नव्याने मंजुरी घेताना सर्व नियमांचे पालन झाले आहे का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.दरम्यान, या आरोपांवर मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “दरबार रोड येथील चाँद बेपारी यांच्या इमारतीचे काम सुरू असून त्याचे अहवाल नगरपालिकेकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच बांधकामास परवानगी देण्यात आली आहे,” असे त्यांनी सांगितले.तथापि, या प्रकरणात वस्तुस्थिती समोर यावी आणि सर्व नियमांचे पालन झाले आहे का याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारदारांनी कायम ठेवली आहे. आवश्यक कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्याचा इशाराही श्रीकांत सुर्वे यांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कोकण विभागीय आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांना माहिती व पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते आणि वादावर पडदा कधी पडतो, याकडे मुरुडकरांचे लक्ष लागले आहे.
