
रानावनात भटकणाऱ्या मेंढपाळ बांधवांच्या कळपात जाऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
दौंड प्रतिनिधी –
आई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी धायगुडे शिंगटे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या३०१ वी जयंतीचे औचित्य साधून दौंड तालुक्यातील गोपाळवाडी ( ता. दौंड ) येथील रानावनात भटकणाऱ्या मेंढपाळ महिला भगिनी व मेंढपाळ बांधवांच्या कळपात जाऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना शुभांगी धायगुडे शिंगटे म्हणाल्या की, भारतीय इतिहासात अनेक पराक्रमी राजे, दूरदृष्टी असलेले प्रशासक आणि लोकहितासाठी आयुष्य अपूर्ण करणाऱ्या व्यक्ती होऊन गेल्या. परंतु जनतेच्या मनावर मातृत्वाच्या भावनेने अधिराज्य गाजविणाऱ्या व्यक्तिमत्वांमध्ये लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. ३१ मे हा दिवस त्यांच्या जयंतीदिनाच्या रुपाने संपूर्ण देशात आदराने साजरा केला जातो. समाजकारण आणि लोककल्याण यांचा अद्भुत संगम घडवून आणणाऱ्या अहिल्यादेवी या केवळ एका संस्थानाच्या राणी नव्हत्या, तर त्या लोकांच्या सुखदुःख सहभागी होणाऱ्या एक संवेदनशील माता होत्या. त्यांचे संपूर्ण जीवन हे कर्तव्य त्याग, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेचा आदर्श मानले जाते. स्ञीशक्तीचे एक प्रभावी प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पतीच्या मृत्यूनंतर सती न जाता आदर्श राज्य कारभार केला. हिंदू धर्म जीवंत ठेवण्याचे काम अहिल्यादेवी यांनी केले. सर्वात जास्त दुःख त्यांना त्यांच्या जावई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीला सती जाण्यापासून रोखता आले नाही हे त्यांच्या जीवनातील सर्वात खुप मोठे दुःख होते. शुभांगी धायगुडे शिंगटे म्हणाल्या की, आज माझ्या जीवनातील सर्वात जास्त आदर्श कोण असेल तर त्या, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, माता रमाई आंबेडकर यांच्या नंतर जर कोणी माझा आदर्श कोण असेल तर तो म्हणजे माझा मेंढपाळ बांधव. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रानावनात भटकणाऱ्या मेंढपाळ बांधवांच्या कळपात जाऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी मेंढपाळ बांधवांना मिठाई वाटप करुन मेंढपाळ महिलांच्या नेतृत्वात आहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव अहिल्या लेकीसाठी मेंढपाळ वाड्यावर जाऊन विधायक रीतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला.
