
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ट्रक, कंटेनर आणि कारची धडक; चालक-क्लिनर ठार, तिघेजण जखमी खोपोली पोलिसांत गुन्हा दाखल; अपघाताचा तपास सुरू
रायगड – अमुलकुमार जैन
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी (दि. १) पहाटे झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांच्यात झालेल्या या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास मुंबई वाहिनीवरील मिसिंग लिंक परिसरात हा अपघात घडला. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोर असलेल्या खाद्यतेल वाहून नेणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेच्या वेळी शेजारच्या मार्गिकेतून जात असलेल्या एर्टिगा कारलाही ट्रकची धडक बसली.अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की तांदूळ भरलेला ट्रक आणि कंटेनर दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत ट्रक चालक अरविंदकुमार रंगाराव अल्लू (वय ४४) आणि त्यांचा क्लिनर शिवा अप्पाराव भुक्का (दोघेही मूळ रा. कृष्णा जिल्हा, आंध्रप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी सौरभ मुकिंदा सस्ते (वय २६, रा. खारघर, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. अपघातात सौरभ सस्ते, लिलाबाई किरण सस्ते (वय ७६) आणि महेंद्र कुमार पॉल हे जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, अपघातामुळे मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक द्रुतगती मार्ग आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली. परिणामी सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अपघात नोंद क्रमांक १९९/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रडू करीत आहेत.
