
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडून दौंडच्या माजी आमदार उषादेवी जगदाळे यांना श्रद्धांजली ;
जगदाळे कुटुंबियांचे केले सांत्वन [ दौंड तालुक्यातील लाईट, पाणी आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत घेतला विकासकामांचा आढावा ] दौंड प्रतिनिधी – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दौंड येथे भेट देऊन, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल (बाबा) जगदाळे यांच्या मातोश्री आणि दौंड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. खासदार सुळे यांनी जगदाळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, तसेच शोकव्याकुळ जगदाळे कुटुंबियांचे सांत्वन केले. माजी आमदार उषादेवी जगदाळे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने दौंड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. आज सांत्वन भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी जगदाळे कुटुंबियांच्या पाठीशी पक्ष आणि आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. — स्थानिक प्रश्न आणि विकासकामांचा घेतला आढावा…. या सांत्वन भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड शहर आणि तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांचा आढावा घेतला. सध्या कडक उन्हाळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, तालुक्यातील पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, वीज पुरवठा (लाईट) आणि इतर नागरी समस्यांबाबत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. या सर्व प्रश्नांवर प्रशासकीय पातळीवर तातडीने पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा देण्याबाबत त्यांनी स्थानिक नेत्यांशी सविस्तर चर्चा केली व आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष रामभाऊ अण्णा टुले, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, प्रदेश सरचिटणीस अजित शितोळे, सोशल मीडिया अध्यक्ष चैतन्य पाटोळे, दौंड शहर महिला अध्यक्षा आरोही वाघमोडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव खराडे,श्रेयस सोनवणे,दिपक सोनवणे तसेच दौंड नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक, महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
