
इंडो – अमेरिकन सोसायटीचा ६७ वा स्थापना दिन महिलांच्या सन्मानाने साजरा
मुंबई-प्रतिनिधी
‘किताब महाल, फोर्ट, मुंबई येथे इंडो – अमेरिकन सोसायटीचा ६७ वा स्थापना दिन सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देत उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. सी एस परमेश्वर आणि कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाला विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थति लावली. यावर्षीच्या स्थापना दिन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ३३ गरजू महिला भाजी विक्रेत्यांचा सन्मान होय. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह एकट्याने करणाऱ्या या महिलांना संस्थेतर्फे गौरवचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील दुर्बल घटकांप्रती सहानुभूती, समावेशकता आणि सामाजिक उन्नतीची भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या सुशिबेन शाह उपस्थित होत्या. त्यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करताना कष्टकरी महिलांच्या योगदानाची दाखल घेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता, सामाजिक जबाबदारी आणि मानवतेची भावना अधिक दृढ होते.
