

दीप दर्पण न्यूज च्या दणक्यानंतर अधिकारी-राजकारण्यांची धावपळ;वरसेतील जीवघेण्या रस्त्यावर रातोरात प्लेट टाकून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न
रोहा:प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधील जीवघेण्या रस्त्याचा प्रश्न दीप दर्पण न्यूज ने उचलून धरताच प्रशासन आणि संबंधित राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून नागरिक जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करत होते, मात्र अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.
परंतु बातमी प्रसिद्ध होताच रातोरात रस्त्यावर लोखंडी प्लेट टाकून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा आव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे “दीप दर्पणची बातमी लागताच फाईल हलते,” अशी चर्चा आता परिसरात जोर धरू लागली आहे. निर्भीड पत्रकारिता आणि भ्रष्ट कारभार उघड करणाऱ्या दीप दर्पण न्यूज मुळे अनेक अधिकारी आणि राजकारण्यांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, हे काम नवीन असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात जुन्याच निकृष्ट कामावर पांघरूण घालण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. “ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळफेक करून चुना लावण्याचे काम सुरू आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, टाकण्यात आलेल्या लोखंडी प्लेटवरून वाहन चालवताना मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात या प्लेट घसरड्या होऊन दुचाकीस्वारांसाठी जीवघेण्या ठरू शकतात, अशी भीती वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे. “या प्लेटवरून वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे,” अशी चर्चा सुरू आहे.
आता या रस्त्यावर एखादी दुर्घटना घडल्यास त्याला संबंधित ठेकेदार आणि प्रभाग क्रमांक ४ मधील लोकप्रतिनिधींनाच थेट जबाबदार धरले पाहिजे, असा सवाल स्थानिक रहिवाशांनी शासनाकडे उपस्थित केला आहे. संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
