
*रोहा उड्डाणपुलाच्या पर्यायी मार्गाचा प्रश्न मार्गी लावणार; खासदार सुनील तटकरे यांचे १५ दिवसांत पाहणीचे आश्वासन*
*महेश मोहिते*रोहा (प्रतिनिधी):*
* रोहा अष्टमी नगर परिषद क्षेत्रातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेले खासदार सुनील तटकरे यांनी शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अत्यंत सकारात्मक भूमिका मांडली. रोहा रेल्वे फाटकाजवळील उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांचे होत असलेले हाल आणि पर्यायी मार्गाची झालेली दयनीय अवस्था यावर रोहयातील पत्रकारांच्या प्रतिनिधींनी त्यांना जाब विचारला असता, येत्या १५ दिवसांत स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी करणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले.रोहा रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या कामासाठी जो पर्यायी मार्ग देण्यात आला आहे, तो अत्यंत खराब आणि धोकादायक बनला आहे. खड्डे आणि धुळीमुळे वाहन चालकांचे पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नाबाबत ‘रोह्यातील पत्रकारांनी तटकरे साहेबांना मुलाखतीत विचारले की, “शहरात विकासाची गंगा वाहत असताना रेल्वे फाटक समोरील रस्त्या व दुचाकी व तिचाकीसाठी पर्यायी मार्ग धोकादायक ठरत आहे? महारेल प्रशासन निवेदनांना केराची टोपली का दाखवत आहे?”पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, “रोह्याचा विकास हीच आमची प्राथमिकता आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे पर्यायी मार्गावर नागरिकांना त्रास होत आहे, ही बाब गंभीर आहे. मी येत्या १५ दिवसांच्या आत स्वतः घटनास्थळाची पाहणी करीन. महारेलच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यावर सविस्तर चर्चा केली जाईल.”ते पुढे म्हणाले की, “नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सुसज्ज पर्यायी मार्ग तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या जातील. पाहणी केल्यानंतरच पुढील नियोजनाचा ठोस आराखडा तयार करून हा विषय कायमचा मार्गी लावला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तटकरे साहेबांनी दिलेल्या या शब्दांमुळे रोहावासीय व पिंगळसई .खारापटी.पडम भागातील लोकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या अडेल धोरणामुळे रखडलेला हा प्रश्न आता खासदारांच्या मध्यस्थीने सुटेल, अशी चिन्हे दिसत आहेत. यावेळी अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
